औरंगाबाद: ब्रिजवाडी येथील एका ८ वर्षीय बालकाचा पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ( दि. २ ) पहाटे घडली. इमरान शेख सुलतान असे मृत बालकाचे नाव असून १० फेब्रुवारीस त्याच्यासह ७ जणांना कुत्र्याने चावा घेतला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, १० फेब्रुवारी रोजी ब्रीजवाडी येथील इमरान शेख सुलतान, अल्फिया सत्तार शेख, भागाजी नवतुरे यांच्यासह नारेगाव येथील चारजणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. यानंतर सर्वांवर वैद्यकीय उपचार सुरु होते. दरम्यान, इमरान शेख सुलतान यावर शासकीय रुग्णालय घाटी येथे इंजेक्शनचा डोस सुरु होता. त्याला सोमवारी चवथे इंजेक्शन देण्यात येणार होते. मात्र त्यापूर्वीच रविवारी रात्री त्याची तब्येत अचानक खराब झाली आणि पहाटे ३ वाजेच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
बालकाच्या मृत्यूनंतर महापालिका सक्रीय
शहरातील बेवारस कुत्रे ब्रीजवादी, नारेगाव या भागात आणून सोडण्यात येतात अशी तक्रार या भागातील नागरिकाची अनेक दिवसांपासून आहे. यामुळे इथे अनेक पिसाळलेली कुत्रे भटकत असतात. याची महापालिकेकडे तक्रार करूनही योग्य ती कारवाई होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. दरम्यान, सोमवारी ८ वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर महापालिकेने वरतीमागून घोडे लावत आता कुत्रे ताब्यात घेण्याचे काम सुरु केले आहे. या भागात कुत्रे पकडणारी गाडी पोहांचली असून त्यांनी काही कुत्रे ताब्यात घेतली आहेत.