गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल रोडे यांच्या पथकाने १९ मे २०१७ रोजी आरोपीच्या घरी छापा मारून स्कॅनर प्रिंटर आणि २ हजारांच्या २१३ नकली नोटा, ५०० च्या १५२ नकली नोटा आणि १०० च्या ९३ बनावट नोटा तसेच २ हजार रुपयांच्या ४ खऱ्या नोटा आणि ५०० च्या ३० खऱ्या नोटा जप्त केल्या होत्या. आरोपीच्या अंगझडतीमध्ये प्रेस लिहिलेले ओळखपत्र, मोबाईल, ए फोर चे ७८ बाँड पेपर वगैरे असा ३३ हजार ८११ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीने २००० च्या २ बनावट नोटा तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यासंदर्भात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. खटल्याच्या सुनावणीवेळी अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी ५ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सरकार पक्षाने बनावट नोटा तयार करून विकण्याची तयारी करत असल्याचे पुराव्यांनिशी सिद्ध केले. त्यावरून न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ४८९ (ए) आणि ४८९ (डी) खाली प्रत्येकी ८ वर्षे सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंड, कलम ४८९ (सी) नुसार ३ वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंड ठोठावला. पैरवी अधिकारी म्हणून भीमराव घुगे यांनी काम पाहिले.
बनावट नोटा तयार करणाऱ्याला ८ वर्षे सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 4:02 AM