गोदाकाठच्या उत्कृष्ट मातीमुळे निर्माण होणारी पैठणची वीट लोकप्रिय असून या विटांना बांधकामासाठी मोठी मागणी असल्याने शेकडो वर्षांपासून पैठण परिसरास विटांचा उद्योग सुरू आहे. अलीकडच्या दहा वर्षांत अनेक सुशिक्षित बेरोजगार या व्यवसायात उतरल्याने स्पर्धेतून दर्जेदार विटांची निर्मिती पैठण परिसरात होत आहे. पैठण शहरातील गोदाकाठ परिसरासह सिध्देश्वर मंदिर, पाटेगाव, शहागड रोड परिसरात पाच ते सात किलोमीटर पर्यंत वीटभट्ट्यांचे जाळे उभे राहिले आहे. बुधवारी सायंकाळी पैठण परिसरास जोरदार पावसाने झोडपून काढले. पावसाच्या तडाख्यात भाजण्यासाठी तयार असलेल्या लाखो विटांचा चिखल झाला आहे.
चार कोटींचे नुकसान
परिसरातील वीटभट्ट्यावर साधारणपणे ८० ते ९० लाख कच्च्या विटांचा माल तयार होता. या विटा भिजल्या असून त्यांचे चिखलात रुपांतर झाले आहे. या विटांंचा चिखल झाल्याने एकंदरीत चार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
-संतोष धापटे, वीटभट्टी मालक
कोट
शेवटचा माल आमचा नफा असतो.
पावसाने जो माल भिजला तो शेवटचा माल होता. परराज्यातील मजूर विटा थापून परत गेले आहेत. चिखलाच्या परत विटा थापण्यासाठी आता मजूर उपलब्ध नाहीत. वीटभट्टी मालकांसाठी शेवटच्या भट्ट्या हाच नफा असतो. मात्र, दुर्दैवाने अवकाळी पावसाने संपूर्ण माल भिजल्याने वीटभट्टी मालकांचे मोठे नुकसान झाले आहे.
-पवन शिसोदे, वीटभट्टी मालक