नांदेड : फुलांच्या शेतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल पाहता यावर्षी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातंर्गत जिल्ह्यासाठी ७९ लाख ४८ हजार रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यामुळे या योजनेचा लाभ घेवून इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना पॉलिहाऊसची उभारणी करता येणार आहे.जिल्ह्यात मुदखेड, नांदेड, अर्धापूर, हदगाव, लोहा यासह इतरही काही तालुक्यांत पॉलिहाऊसमध्ये (हरितगृह) फुलांचे उत्पादन घेतले जाते. नांदेड हा फूल उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण होऊ लागली आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फूल उत्पादनाला चालना मिळावी, यासाठी पन्नास टक्के अनुदानावर फूल लागवड करण्यासाठी हरितगृहाची उभारणी केली जाते. हरितगृहात मोठ्या प्रमाणात शेतकरी जरबेरा या फुलांची लागवड करतात. तर काही शेतकरी मोगरा, गुलाब, गलांडा आदी फुलांचे उत्पादन घेत आहेत. फुलापासून दररोज हमखास उत्पन्न मिळत असल्याने बहुतांश शेतकरी याकडे वळत आहेत. फूल उत्पादनामध्ये आता नांदेड जिल्ह्याची ओळख निर्माण होऊ लागली असून शेतकऱ्यांची वाढती मागणी पाहता या वर्षासाठी जवळपास ८० लाखांचा निधी मंजूर केला आहे. (प्रतिनिधी)
पॉलिहाऊस उभारणीसाठी ८० लाख मंजूर
By admin | Published: September 07, 2014 12:21 AM