शिऊर ( औरंगाबाद) : तालुक्यातील पेंडेफळ येथील सेवा सोसायटीवर शेतकरी विकास गटाने एकहाती सत्ता मिळविली आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत गावातील ८० वर्षीय आजीने १५५ मतदान घेत विजय मिळविला आहे.
शेतकरी विकास गटाचे प्रमुख गोकुळ आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवून बारा जागांवर विजय मिळविला. या निवडणुकीत परिवर्तन गटाला पराभव पत्करावा लागला. ही निवडणूक दि. १४ जून रोजी पार पडली. यात ३१८ मतदारांपैक्की ३०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वसाधारण मतदार संघातून इंदुबाई कचरू आहेर या आजीनी १५५ मत घेत दणदणीत विजय मिळविला आहे.
८० वर्षीय इंदूबाई आहेर विजयीपेंडेफळच्या सोसायटीत ८० वर्षीय इंदूबाई कचरू आहेर या महिलेला कुठलाही राजकीय वारसा नसून, पती मयत आहे. इंदूबाई यांना शेषराव हा एकमेव मुलगा असून, ते शेती करतात. आहेर कुटुंबियांतील कुठल्याही व्यक्तीने आजपर्यंत निवडणूक लढवली नसून, प्रथमच ८० वर्षीय इंदूबाई आहेर या सोसायटीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यांनी सर्वसाधारण मतदार संघातून निवडणूक लढवीत १५५ मतदान घेत विजय मिळवला आहे. या उतार वयात निवडणूक कुठल्याही राखीव मतदार संघातून न लढता त्या थेट सर्वसाधारण मतदार संघात निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या होत्या. या निवडणुकीत मतदारांनीसुद्धा त्यांना साथ देत विजयी केले.