छत्रपती संभाजीनगर : आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडलो, याचा फायदा जनतेला झाला. कारण गेल्या अडीच वर्षात मतदारसंघात ८०० कोटींची विकासकामे करता आली. विरोधक फक्त गप्पा मारतात. त्यांनी काय दिवे लावले ते सांगावे, असे आव्हानच शिंदेसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी दिले.
गेली तीन टर्म संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उद्धवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर त्यांना शिंदेसेनेचे प्रवक्ते पद मिळाले. शिरसाट यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. परंतु, मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने महिनाभरापूर्वी त्यांना सिडकोचे अध्यक्षपद देण्यात आले. विधानसभा निवडणुकीसंदर्भात त्यांच्याशी केलेली बातचीत.
प्रश्न- पंधरा वर्षांपासून तुम्ही पश्चिम मतदारसंघाचे नेतृत्व करत आहात. तुम्ही केलेली दोन मोठी कामे सांगा?उत्तर- पश्चिम मतदारसंघातील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, बीड बायपास आणि गोलवाडी रस्त्याची कामे करता आली. या रस्त्यांमुळे बायपासवर घडणारे अपघात थांबले, परिसराचा झपाट्याने विकास होत आहे.
प्रश्न- तुम्ही मुंबईत घर घेतल्यामुळे अनिवासी आमदार आहात, असा आरोप होतो आहे. त्याचे काय?उत्तर- मुंबईत आमचे मूळ घर आहे. वडिलोपार्जित प्रॉपर्टी कोणी सोडून देते का? ज्यांना मतदारसंघ कसा आहे, हे माहिती नाही, ते असे प्रश्न विचारतात, अशा लोकांबद्दल काय बोलावे.
प्रश्न- शहराचा पाणी प्रश्न मागील ३० वर्षांपासून रखडला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही हा प्रश्न सोडविण्यासाठी का पुढाकार घेतला नाही?उत्तर- शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी ८२२ कोटी रुपयांचे सॉफ्ट लोन राज्य सरकारने मंजूर केले आहे. यामुळे नव्या योजनेचे पाणी तीन महिन्यात शहरवासीयांना मिळणार आहे. शहराला दीड वर्ष पाणीपुरवठा होणार नसल्याचा विरोधी पक्षाच्या आरोपात तथ्य नाही.
प्रश्न- उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला आमदार केले. त्यांचीच साथ सोडल्यामुळे तुमच्यावर गद्दारीचा आरोप होतोय?उत्तर- मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मिळत नव्हता, आम्हाला निष्क्रिय आमदार म्हणून हिणवले जात होते. यामुळेच आम्ही उठाव केला. मागील अडीच वर्षात झालेली विकासकामे पाहून आमची भूमिका योग्यच होती हे आता जनतेला पटले आहे.
प्रश्न- उद्धवसेनेला मतदान म्हणजे एमआयएमला मतदान, असे विधान तुम्ही केले होते. म्हणजे कसे ते स्पष्ट करा?उत्तर- पूर्व आणि मध्य मतदारसंघात एमआयएमला मदत करून त्या बदल्यात ते एमआयएमची पश्चिममध्ये मदत घेत आहे. यामुळे उद्धवसेनेला मतदान म्हणजे एमआयएमला मतदान करण्यासारखे असल्याचे विधान योग्यच आहे.
प्रश्न-केवळ दोन वर्षातच कामे केली, मग इतके दिवस काय केले, या आरोपाचे काय?उत्तर-आमच्यासारख्या आमदारांना निधी मिळत नव्हता, यामुळेच आम्हाला उठाव करावा लागला. उठाव केल्यानंतर मागील दोन वर्षात भरघोस निधी मिळाला आणि विकासकामे करू शकलो.