औरंगाबाद: मुख्य जलवाहिन्यांवर शेकडो अनधिकृत नळ घेण्यात आल्याने, अनेक वसाहतींना पाणीपुरवठाच होत नाही. ज्या भागात पाणी येत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत, तेथील मुख्य जलवाहिनीची तपासणी मनपाच्या विशेष पथकाकडून करण्यात येत आहे. शुक्रवारी गादीया विहार, त्रिशरण चौक आणि पडेगाव भागात सर्वेक्षण करण्यात आले. तिन्ही ठिकाणी तब्बल ८०० पेक्षा अधिक अनधिकृत नळ आढळले. लवकरच तेथे कारवाई होईल, असे पथक प्रमुख संतोष वाहुळे यांनी सांगितले.
महापालिकेच्या रेकॉर्डवर फक्त १ लाख ३५ हजार अधिकृत नळ आहेत. अनधिकृत नळांची संख्या दीड ते दोन लाखांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. राजकीय मंडळींनी मतांसाठी अनधिकृत नळ घेण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे समोर येत आहे. एका वॉर्डात किमान एक ते दीड हजार अनधिकृत नळ असतील, असा कयास आहे. बहुतांश नळ मुख्य जलवाहिन्यांवरून घेण्यात आले. त्यामुळे सर्वाधिक वेळ पाणी या नागरिकांना मिळत आहे. शेवटच्या वसाहतीपर्यंत किंवा गल्लीपर्यंत पाणी जात नाही. मागील काही दिवसांपासून मनपाकडे कमी दाबाने, पाणी येत नसल्याच्या तक्रारी मोठ्या संख्येने प्राप्त होत आहेत. या तक्रारीची शहनिशा विशेष पथकाकडून करण्यात येत आहे. चार दिवसांपूर्वीच भावसिंगपुरा, नवयुग कॉलनी भागातील अनधिकृत नळ कापण्यात आले होते. शुक्रवारी मनपाच्या विशेष पथकाने शहानुरमियाँ दर्गा परिसरातील गादीया विहार, त्रिशरण चौक आणि पडेगाव भागात पाहणी केली. तिन्ही ठिकाणी ८०० पेक्षा अधिक नळ मुख्य जलवाहिन्यांवरून घेतल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी अनधिकृत नळही आहेत.
कारवाई तर होणारचमहापालिका शनिवारी किंवा रविवारी अनधिकृत नळ खंडित करण्याची मोहीम राबविणार आहे. नळ खंडित केल्यावर पाइपही जप्त केला जाईल. नागरिकांनी रितसर अर्ज करून मनपाकडून अधिकृत नळ घ्यावा. ज्या पद्धतीने मुख्य जलवाहिन्यांची चाळणी करण्यात आली आहे, हे शहरासाठी योग्य नाही.- संतोष वाहुळे, विशेष पथक प्रमुख.