औरंगाबाद : केंद्र शासनाकडून रविवारी सायंकाळी औरंगाबाद जिल्ह्याला ३१ हजार लसींच्या डोसचा साठा देण्यात आला. त्यातील ११ हजार डोस महापालिकेच्या वाट्याला आले. सोमवारी शहरातील ३९ केंद्रांवर लसीकरण सुरू झाले. दुपारी ४ वाजेपर्यंत ८ हजार डोस संपले. मंगळवारी ३ हजार डोससाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येईल. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत महापालिकेला आणखी साठा न मिळाल्यास बुधवारी लसीकरण बंद ठेवावे लागणार आहे.
शहरात अनेक दिवसांपासून लसीची टंचाई जाणवत आहे. दुसरा डोस मिळावा म्हणून हजारो नागरिक एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर धाव घेत आहेत. कोणाचे शंभर तर कोणाचे सव्वाशे दिवस लसीकरण करून उलटले आहेत. या गंभीर प्रश्नावर ‘लोकमत’ने सातत्याने प्रकाश टाकला. त्यामुळे महापालिकेला वाढीव स्वरूपात डोस मिळण्यास सुरुवात झाली. सोमवारी शहरातील ३९ केंद्रांवर सकाळी १० वाजेपासून लसीकरणाला सुरुवात झाली. प्रत्येक केंद्रावर लांबलचक रांगा लागल्या होत्या. मोठ्या केंद्रांवर २०० तर लहान केंद्रांवर १५० डोस देण्यात आले होते. दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत ८ हजार डोस संपले. मंगळवारी सकाळी ३ हजार डोससाठी लसीकरण होणार असल्याचे आरोग्य विभागाने कळविले. शासनाकडून आणखी साठा मिळावा यासाठी महापालिकेने पाठपुरावा सुरू केला आहे.
दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा यादी जवळपास ८२ हजारांवर पोहोचली आहे. शहरातील खासगी रुग्णालयांकडेही लसीचा २२ हजार साठा पडून आहे. खासगी कंपन्यांमधील कर्मचारी पैसे देऊन लस घेत आहेत. दररोज ८०० ते १२०० नागरिकांना खासगी रुग्णालयांमधील लस दिली जात आहे.