औरंगाबाद : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत स्थापन केलेल्या आॅरिकमध्ये (औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी) ८ औद्योगिक भूखंड वाटपातून तब्बल ८१ कोटी २८ लाख रुपयांची उलाढालझाली आहे.
शेंद्रा येथील भूखंड वाटपासाठी ‘एमआयडीसी’च्या प्रादेशिक कार्यालयात मंगळवारी बैठक झाली. यावेळी औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेडतर्फे भूखंडांचे वितरण क रण्यात आले. यामध्ये एका परदेशी तर ७ भारतीय औद्योगिक कंपन्यांना भूखंडांचे वितरण करण्यात आले. लघु, मध्यम आणि मोठ्या अशा स्वरूपाच्या उद्योगांना हे भूखंड वाटप झाले आहेत.
या ८ औद्योगिक कंपन्यांची प्रत्यक्ष उभारणी झाल्यानंतर किमान ३०० पेक्षा अधिक लोकांना रोजगार मिळणार आहे. याबरोबरच २ निवासी आणि १ कमर्शियल भूखंडाचेही वाटप झाले आहे. आॅरिक सिटीत एकूण जमिनीपैकी ६० टक्के उद्योग, तर ४० टक्के निवासी, सामाजिक-सांस्कृतिक उद्देशांसाठी जमिनीचा वापर केला जाणार आहे. त्यानुसार भूखंडाचे वाटप होत आहे.यास औद्योगिक कंपन्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतीय कंपन्यांबरोबर परदेशी कंपन्यांना गुंतवणुकीसाठी आॅरिक सिटी महत्त्वपूर्ण ठरत आहे.
एकूण ४३ भूखंड वाटपयाविषयी सरव्यवस्थापक गजानन पाटील म्हणाले, यापूर्वी ३५ भूखंडांचे वाटप झाले होते. आता आणखी ८ भूखंडांचे वाटप झाले असून, त्यातून ८१ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. एकूण ४३ भूखंड वाटप झाले आहेत.