औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने कोविडच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीत आजपर्यंत ८१ लाखांचा निधी जमा केला आहे. शुक्रवारी यातील २० लाख ६८ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी सुनील जाधव यांच्याकडे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांंनी सुपुर्द केला.
राज्य शासनाच्या आवाहनानुसार कुलगुरू, प्रकुलगुरू, कुलसचिव यांच्यासह संवैधानिक अधिकारी, वर्ग एक दर्जाचे अधिकारी व प्राध्यापक यांनी दोन दिवसांचे वेतन, तर उर्वरित कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, ३८१ जणांचा २० लाख ६८ हजार रुपयांचा जमा निधी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
पहिल्या टप्प्यात १७ लाख ५५ हजार रुपयांची रक्कम देण्यात आली, तर दुसऱ्या टप्प्यात ९ लाखांचा निधी त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनांतर्गत ३५ लाख अशा प्रकारे आजपर्यंत एकूण ८१ लाख ७४ हजार ५०३ रुपयांचा निधी देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी आपला देश आणि राज्य सध्या कोरोना महामारीच्या संकटातून जात आहे. राज्य शासन या महामारीचा उद्रेक रोखण्याकरिता प्रयत्नशील आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या देशासाठी काहीतरी केले पाहिजे. या भावनेतून महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचारी, तसेच अन्य दानशूर मंडळींनीही मुख्यमंत्री सहायता निधीकरिता योगदान द्यावे, असे आवाहन केले.