छत्रपती संभाजीनगर : शहरात मोकाट श्वानांचा उच्छाद प्रचंड वाढला आहे. रात्री दुचाकीवर काही भागांत ये-जा करणे अत्यंत अवघड आहे. महापालिका मोकाट श्वानांच्या नसबंदीवर दरवर्षी लाखो रुपये खर्च करीत आहे. मागील वर्षभरात ८२ लाख ४५ हजार ३०० रुपये खर्च करण्यात आल्याची कागदोपत्री नोंद आहे. पण त्यानंतरही मोकाट श्वानांची संख्या वाढतच आहे. नागरिकांना होणारा त्रास काही कमी होत नाही.
शहरात नेमके मोकाट श्वान किती, या प्रश्नाचे उत्तर महापालिकेस मागील दोन दशकांत तरी देता आले नाही. किमान १० वर्षांपासून मोकाट श्वानांच्या नसबंदीचा उपक्रम राबविण्यात येताेय. दर दोन ते तीन वर्षांनी नसबंदी करणाऱ्या संस्था बदलण्यात येतात. सध्या मध्यवर्ती जकात नाका येथे मोकाट श्वान पकडून आणले जातात. याच ठिकाणी नसबंदी केली जाते. खूण म्हणून नसबंदी केलेल्या श्वानाचे कान थोडेसे कापण्यात येतात. एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ पर्यंत ९ हजार ५७८ श्वानांची नसबंदी करण्यात आली. यामध्ये ४ हजार ९१३ नर, ४ हजार ६७४ माद्यांची नसबंदी केली. यावर ८२ लाख रुपये खर्च करण्यात आले.
चार महिन्यांत ९०० जणांवर उपचारमोकाट श्वान चावल्यानंतर लस घेण्यासाठी नागरिकांना घाटी रुग्णालयात जावे लागते. दररोज किमान १० रुग्ण श्वानदंशाचे येतात. चार महिन्यांत किमान ९०० जणांना श्वानांनी चावे घेतले.
या परिसरात सर्वाधिक त्रासपडेगाव, आकाशवाणी, सिल्लेखाना, मध्यवर्ती जकात नाका, सेवन हिल अग्निशमन दल निवासस्थाने, सुराणानगर, नारेगाव इ. भागांत मोकाट श्वानांचा त्रास जास्त आहे.
रोज दहा जणांवर हल्लाशहर आणि परिसरात दररोज किमान १० जणांचे लचके मोकाट श्वान तोडतात. महापालिकेच्या आरोग्य केंद्रांवर श्वान चावल्यावर देण्यात येणारे दोन्ही लस उपलब्ध नसतात. त्यामुळे नागरिकांना घाटीत जावे लागते.
रात्री घराबाहेर पडणे अवघडदुचाकी, चारचाकी वाहनधारकांवर रात्री १२ ते २ या वेळेत श्वान धावून जातात. त्यामुळे अनेकदा अपघातही होतात. रात्री घराबाहेर पडणे अवघड बनले. अलीकडे काही सोसायट्यांपर्यंत मोकाट श्वानांचा त्रास सुरू झाला आहे. मनपाने यासंदर्भात ठोस उपाययोजना करायला हव्यात.- अय्युब खान, नागरिक
रेबीज बाधित घटले२०२१-२२ या आर्थिक वर्षात शहरात एकही रेबीजबाधित नागरिक आढळून आला नाही. पूर्वी दरवर्षी १० ते १७ नागरिकांचा मृत्यू होत होता. मृत्यूचे हे प्रमाण थांबले, ही शहरासाठी समाधानाची बाब म्हणावी लागेल. नसबंदी प्रभावीपणे सुरू आहे.- शाहेद शेख, पशुसंवर्धन अधिकारी, मनपा.