छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित ८३ महाविद्यालये ‘ॲकडमिक ऑडिट’ अर्थात शैक्षणिक अंकेक्षणात सपशेल नापास ठरली आहेत. त्यामुळे या महाविद्यालयांची मनुष्यबळ व पायाभूत सुविधा तपासूनच प्रथम वर्षांची प्रवेश क्षमता स्थगित अथवा कमी करण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला आहे.
मागील तीन वर्षांपासून संलग्नित महाविद्यालयांचे ॲकडमिक ऑडिट सुरू करण्यात आले. पहिल्या टप्प्यात २७१ महाविद्यालयांचे अकॅडमिक ऑडिट केले. दुसऱ्या टप्प्यात १०२ महाविद्यालयांचे ऑडिट करण्यात आले. शैक्षणिक विभागाने सोमवारी रात्री यासंबंधीची ग्रेडसह यादी प्रकाशित केली. त्यात १०२ महाविद्यालयांचा समावेश असून १९ महाविद्यालयांपैकी ‘ए’ ग्रेड मिळविणारे वैजापूरचे एकमेव महाविद्यालय आहे. ‘बी’ ग्रेड प्राप्त दोन महाविद्यालये, ‘सी’ ग्रेड प्राप्त ५ आणि ‘डी’ ग्रेड प्राप्त ११ महाविद्यालयांचा समावेश आहे.
अकॅडमिक ऑडिट झालेली जिल्हानिहाय महाविद्यालये पुढीलप्रमाणे - बीड ३७ (ग्रेड -४, नोग्रेड -३३), छत्रपती संभाजीनगर २८ (ग्रेड-९, नोग्रेड -१९), जालना ११ (ग्रेड-२, नोग्रेड-९), उस्मानाबाद २६ (ग्रेड-४, नोग्रेड-२२). विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ८३ महाविद्यालये ‘नोग्रेड’ श्रेणीत आहेत. या महाविद्यालयांची पायाभूत सुविधा व मनुष्यबळ तपासून प्रथम वर्षांची प्रवेश क्षमता स्थगित करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थीसंख्याही घटविण्यात येणार आहे.
आक्षेप नोंदविण्यासाठी मुदतउर्वरित ३४ महाविद्यालयांच्या अंकेक्षणाची यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ज्या महाविद्यालयांना प्राप्त श्रेणीबाबत काही आक्षेप असल्यास येत्या सात दिवसांत ते सादर करावेत, असे शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव डॉ. संजय कवडे यांनी कळविले आहे.
नवीन महाविद्यालयांना मान्यताराज्य शासनाकडून तसेच व्यावसायिक महाविद्यालयांना स्वायत्त परिषदांकडून मान्यता मिळते. तथापि शैक्षणिक दर्जा, अंकेक्षण व गुणवत्ता तपासणे ही विद्यापीठांची जबाबदारी आहे. विद्यापीठ प्रशासन म्हणून आम्ही आमचे उत्तरदायित्व पार पाडत आहोत. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांसाठी संलग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त अभ्यासक्रम व प्रवेश क्षमता यासंबंधीची अंतिम यादी बुधवारी सायंकाळी प्रसिद्ध केली जाईल.- डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू