औरंगाबाद: डिमांड ड्राफ्ट काढण्यासाठी दिलेल्या रक्कमेचा अपहार करून तीन व्यापार्यांना तब्बल ८३ लाख १५ हजार ५० रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी आर्थिक गुन्हेशाखेने सोसायटीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाला अहमदनगर येथून पकडून आणले.
अध्यक्ष प्रमोद बालाजी निमसे (३२,रा. केडगाव, अहमदनगर)आणि उपाध्यक्ष गणेश शंकर थोरात (३२)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यात लातूर शाखेचा माजी चेअरमन चंद्रकांत बतकुलवार यास यापूर्वी अटक केलेली आहे. आर्थिक गुन्हेशाखेचे निरीक्षक श्रीकांत नवले यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, आज अटक केलेले निमसे व थोरात हे आरोपी त्रिमूर्ती चौक येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोधर सावकर मल्टीस्टेट को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहेत. त्यांची मुख्य कार्यालय अहमदनगर येथे आहे. आरोपी हे अहमदनगर येथे राहतात. त्यांच्या सोसायटीच्या औरंगाबादेतील त्रिमूर्ती चौकातील शाखेत तक्रारदार जयपालदास गिरधारीलाल साहित्या (रा. महरुम तलाव, जि. जळगाव) यांच्यासह अन्य दोन व्यापार्यांनी डिमांड ड्राफ्ट (डी.डी.) काढण्यासाठी ५ नोव्हेंबर २०१६ रोजी तब्बल ८३ लाख १५ हजार ५० रुपये जमा केले होते. परंतु सोसायटीने त्यांना डिमांड ड्राफ्ट न देता फसवणूक केली होती. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा नोंदविण्यात आला असून आर्थिक गुन्हेशाखेचे निरीक्षक नवले हे तपास करीत आहेत.