छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात ८ ते २० मार्च दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सुधारित दरानुसार ८४ कोटी ७५ लाख १९ हजार रुपयांच्या मदतनिधीचा अहवाल शासनाकडे जात नाही तोवर, ७ एप्रिलपासून आजवर झालेल्या गारपिटीमुळे २४१ गावांतील १९ हजार ६४ शेतकऱ्यांचे ९ हजार ९४० हेक्टरवरील बागायत, फळपिकांचे नुकसान झाले आहे. ८४ कोटींची मागणी कागदावर असतानाच पुन्हा नुकसानीची भर त्यात पडणार आहे. वीज पडून चौघांचा मृत्यू झाला. लहान मोठे मिळून १०६ जनावरे दगावली. तसेच ६९ मालमत्तांची पडझड झाली आहे.
विभागात ८ ते २० मार्चदरम्यान झालेल्या गारपीट, अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजार १८ शेतकऱ्यांचे सुमारे ६० हजार ४०२ हेक्टर क्षेत्रातील रबी पिके, तसेच फळबागांचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी २० कोटी ९२ लाख, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी ५१ कोटी ५९ लाख, फळपिकांच्या नुकसानीसाठी १२ कोटी २३ लाख, असे सुमारे ८४ कोटी ७५ लाख ९१ हजार रुपयांची मदत नुकसान भरपाईसाठी मागितली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १३,५३५ हेक्टरवरील नुकसानीसाठी २२ कोटी १७ लाख, जालन्यात १,९६९.४९ हेक्टरसाठी ३ कोटी ६७ लाख, परभणी ३,९६०.८१ हेक्टरसाठी ४ कोटी ३७ लाख, हिंगोलीत ३,८३८.७२ हेक्टरसाठी ६ कोटी ४ लाख, नांदेड २१,५७९.५० हेक्टरसाठी ३० कोटी ५२ लाख, बीड ३,८०२.०२ हेक्टरसाठी ५ कोटी ९९ लाख, लातूर जिल्ह्यात १०,३६७.८३ हेक्टरसाठी १० कोटी ५६ लाख तर धाराशिव १,३४९.०० हेक्टरसाठी १ कोटी ३९ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. विभागातील एकूण ६०,८१९.१६ हेक्टरवरील पिकांचे नुकसानीसाठी ८४ कोटी ७५ लाख १९ हजार रुपयांची मागणी केली आहे.
तीन दिवसांत झालेले नुकसान असे...छत्रपती संभाजीनगर : ४७९८ हेक्टरबीड : २४१७ हेक्टरलातूर : १४४ हेक्टरधाराशिव : २५८१ हेक्टरएकूण : ९९४० हेक्टर