बीड : जिल्ह्यातील चार ठिकाणच्या नगर पंचायतीचे मतदान रविवारी शांततेत पार पडले. सकाळी ७ पासून मतदानाला सुरूवात झाली होती. पुरूषांबरोबरच महिलांनी देखील उत्स्पूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. वडवणी, आष्टी, शिरूर कासार याठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त असल्याने कुठल्याही गरबड-गोंधळाशिवाय मतदान पार पडले.मागील दहा दिवसांपासून जिल्हयातील चार ठिकाणी म्हणजेच वडवणी, आष्टी शिरूर कासार व पाटोदा या ठिकाणी नगर पंचायतींची रणधुमाळी सुरू होती. पहिल्यांदाच नगर पंचायतीच्या निवडणूका होत असल्याने प्रशासनाने शांततेत निवडणुका पार पाडण्यासाठी तयारी केली होती. सकळी दहा नंतर मतदानासाठी मोठ्या प्रमाणात नागरीक घराबाहेर पडले होते. सकाळी ११ पर्यंत ५५ ते ६० टक्के मतदान झाले होते. मतदान करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी लगबग दिसून आली.सर्वाधिक शिरूर कासार येथे मतदान झाले. एकूण ३ हजार ९०२ मतदारांपैकी ३ हजार ५६८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. काही उमेदवारांनी मतदारांसाठी वाहन व्यवस्था केली होती. शेवटच्या क्षणापर्यंत मते वळविण्याचा प्रयत्न उमेदवार, कार्यकर्त्यांकडून झाला.दरम्यान, सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांचा उत्साह पहायला मिळाला. दुपारनंतर मतदारांचा ओघ काहीसा कमी झाला होता. ठिकठिकाणी मोठा बंदोबस्त होता. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. (प्रतिनिधी)
नगरपंचायतींसाठी ८४ टक्के मतदान
By admin | Published: November 02, 2015 12:04 AM