छत्रपती संभाजीनगर : १२ वर्षांपूर्वी रिक्षाचालकाला चाकूचा धाक दाखवून ८५० रुपये हिसकावणारा सय्यद शरीफ सय्यद मुसा (रा. पवननगर, रांजणगवा शे. पुं, ता. गंगापूर) याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. पाटील यांनी मंगळवारी ३ महिने कारावास आणि २०० रुपये दंड सुनावला.
याबाबत रिक्षाचालक तान्हाजी भगवान सुपेकर यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, ८ नोव्हेंबर २०१२ रोजी सायंकाळी ते ओयासीस चौकातून जोगेश्वरीकडे रिक्षा घेऊन जात होते. त्यावेळी हॉटेल ओयासीसच्या पाठीमागील रस्त्यावरील अंधारात दोन अनोळखी व्यक्तींनी रिक्षा थांबविण्याचा इशारा केला. रिक्षा थांबवताच दोघे जवळ आले व ‘तुझ्याजवळ असलेले सर्व पैसे चुपचाप काढून दे’ असे धमकावले. सुपेकर यांनी पैसे नसल्याचे सांगितले. आरोपींपैकी एकाने चाकू काढून सुपेकरांच्या पोटाला लावला व दुसऱ्याने त्यांच्या खिशातील ८५० रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर फिर्यादीच्या तोंडावर ठोसा मारला व तेथून धूम ठोकली. याबाबत एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याच्या तपासानंतर तत्कालीन हवालदार एच. के. शेख यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सहायक सरकारी वकील उद्धव वाघ यांनी ५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार मंजूर हुसैन आणि घुसिंगे यांनी काम पाहिले.