वाळूज महानगर ( औरंगाबाद ) : आदिवासींच्या रिक्त झालेल्या ८५ हजार जागेवर शासनाने नोकरभरती करावी, अशी मागणी अॅड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी तीसगाव येथे आयोजित आदिवासी मेळाव्यात केली. या रिक्त पदाच्या नोकरभरतीसाठी मार्च महिन्यात होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनावर आदिवासी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढण्याचे आवाहन ॲड. आंबेडकर यांनी केली.
महायोद्धा एकलव्य ग्रुप व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुधवारी तीसगाव येथे आदिवासी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याचे उद्घाटन ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून एकलव्य ग्रुपचे संस्थापक बालचंद जाधव, शिवाजी शेळके, वंबुआचे प्रवक्ते फारुक अहेमद, महासचिव प्रा. किसन चव्हाण, अमित भुईगळ, जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, उपाध्यक्ष अंजन साळवे, रामेश्वर तायडे आदींची उपस्थिती होती. मार्गदर्शन करतांना अॅड. आंबेडकर म्हणाले की, राज्यात आदिवासींची संख्या साडेसात कोटी असून, आदिवासीच्या विकासासाठी २१ हजार कोटी रुपयांचे बजेट आहे. मात्र आदिवासींच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविल्या जात नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. आदिवासींना घरपोच जात प्रमाणपत्र द्या, वनजमिनी नावावर कराव्यात, खावटी कर्जाचा लाभ आदिवासींना देण्याची मागणीही त्यांनी केली. पंतप्रधान मोदी फक्त अंबानी, अदानी यांचाच विकास करीत असल्याची टीकाही त्यांनी केली. मेळाव्यात फारुक अहेमद, बालचंद पवार, प्रा. किसन चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. अंजन साळवे यांनी प्रास्ताविक, अॅड.रविकुमार तायडे यांनी सूत्रसंचालन व योगेश बन यांनी आभार मानले.
नोकरभरतीसाठी अधिवेशनावर मोर्चा काढाजात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे राज्य शासनाने ८५ हजार जणांना नोकरीतुन काढुन टाकले आहे. या रिक्त जागेवर नोकर भरती करण्यात यावी, यासाठी विधानसभेच्या अधिवेशनावर आदिवासी विद्यार्थ्यांनी धडक मोर्चा काढण्याचे आवाहन त्यांनी केले. शासनाला रिक्त पदावर नोकरभरती करण्यास भाग पाडू, असेही त्यांनी सांगितले.