औरंगाबाद : शहरातील कोरोनाबाधित रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून हे प्रमाण ८६ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. यामुळे नागरिकांसह आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनालाही दिलासा मिळाला आहे.
यातील आणखी एक समाधानकारक गोष्ट म्हणजे काही दिवसांपासून शहर व परिसरात कोरोनाबाधित रूग्ण सापडण्याचे प्रमाण घटले आहे. अनेकदा तर रूग्णसंख्या १५० पेक्षाही कमी असल्याचे निदर्शनास येते आहे. त्यातही पालिका क्षेत्रातील रूग्णांची संख्या आणखीनच कमी म्हणजेच शंभरपर्यंत आली आहे. रूग्णवाढीचा आलेख उतरत असताना रूग्ण बरे होण्याचा आलेख वाढताना दिसणे औरंगाबादकरांसाठी समाधानकारक ठरते आहे.
कोरोनाबाधितांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त तरूणांची संख्या आहे. तरूणांच्या भटकंतीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे मत आरोग्य यंत्रणेकडून नोंदविले जात आहे. सद्यस्थितीत पालिका क्षेत्रातील एकूण रूग्णांची संख्या २३ हजार २६६ इतकी असून त्यापैकी १३ हजार ३८८ कोरोनाबाधित १८ ते ५० या वयोगटातील आहेत. ५ ते १० वर्षे या वयोगटातील कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ११ असून ० ते ५ वर्षे या वयोगटात ५०९ कोरोनाबाधित आहेत. आतापर्यंत २० हजारांहून अधिक लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.