औरंगाबाद : चालू महिन्याचे वीजबिल भरण्यात आलेले नाही. त्यामुळे आज महाविद्यालयाची वीज बंद करण्यात येईल, असा मेसेज शहरातील एका महाविद्यालयाच्या लिपिकाच्या मोबाइलवर आला. त्यामुळे घाबरलेल्या लिपिकाने मेसेजमध्ये दिलेल्या फोनवर संपर्क केल्यानंतर सायबर भामट्यांनी त्यांना ‘एनी डेस्क’ ॲप डाऊनलोड करण्यास सांगून तब्बल ८६ हजार २८९ रुपयांना फसवले. फसवणूक झाल्याचे समजताच लिपिकाने तासाभरात सायबर ठाणे गाठले. सायबर पोलिसांनी तात्काळ प्रक्रिया करीत संबंधिताचे बँक खाते ‘फ्रीज’ केले. त्यामुळे गेलेेले पैसे लिपिकाला परत मिळणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर यांनी दिली. हा प्रकार २९ ऑक्टोबर रोजी घडला.
विवेकानंद महाविद्यालयातील एका लिपिकाला, महाविद्यालयाचे चालू महिन्याचे वीजबिल भरलेले नाही. त्यामुळे वीज आज बंद करण्यात येत असल्याचा मेसेज आला. वीज बंद झाल्यास व्यवस्थापन आपल्यावरच कारवाई करेल या भीतीपोटी लिपिकाने मेसेजमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क केला. तेव्हा सायबर भामट्यांनी त्यांना ‘एनी डेस्क’ नावाचे ॲप मोबाइलमध्ये डाउनलोड करण्यास सांगितले. त्यावरून दहा रुपये भरून वीजबिल ‘अपग्रेड’ करा, असे सांगितले. त्यानुसार लिपिकाने १० रुपये पाठविले. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ८६ हजार २८९ रुपये ‘डेबिट’ झाले. तेव्हा लिपिकास आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यांनी तात्काळ आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाणे गाठले. तेथे सहायक निरीक्षक सातोदकर यांना घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा सातोदकर यांनी तांत्रिक तपास केल्यानंतर लिपिकाच्या बँक खात्यातून मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमधील एचडीएफसीच्या बँकेतील खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याचे समजले. त्यानंतर अधिकृतपणे संबंधित बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ‘क्रेडिट’ झालेले बँक खाते ‘फ्रीज’ करण्यास सांगितले. त्यामुळे लिपिकाला गेलेले ८६ हजार २८९ रुपये परत मिळणार आहेत. ही कामगिरी निरीक्षक गौतम पातारे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर यांनी केली.
१४ लाख परत मिळविलेऑनलाइन फसवणूक झालेल्या २३ जणांनी सायबर पोलिसांशी तात्काळ संपर्क साधल्यामुळे तब्बल १४ लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम परत मिळवून दिली आहे. त्यामुळे कोणाचीही ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही निरीक्षक गौतम पातारे यांनी केले आहे.