विजय सरवदे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देशभरातील अंगणवाड्यांसमोर ज्या औरंगाबाद जिल्ह्याने ‘आयएसओ’ मानांकनाचा पॅटर्न ठेवला, त्याच जिल्ह्यातील तब्बल ८७५ अंगणवाड्यांमध्ये शौचालयाची सुविधा नाही, तर कित्येक अंगणवाड्यांत पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे येणाऱ्या लाखो बालके, किशोरी मुली, गरोदर माता, स्तनदा माता व सेविकांची मोठी कुचंबणा होत आहे.जिल्ह्यात ३ हजार ४७३ अंगणवाड्या कार्यरत असून, त्यामार्फत सुमारे अडीच लाख बालकांचे नियमित वजन, उंचीची नोंद केली जाते. यासोबतच अंगणवाड्यांमध्ये बालकांचे नियमित लसीकरण केले जाते व त्यांना पूर्व प्राथमिक शिक्षणही दिले जाते. अंगणवाड्यांच्या माध्यमातून किशोरी मुली, स्तनदा माता, गरोदर मातांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले जाते. आरोग्याच्या संदर्भात सेवाही दिल्या जातात. एकीकडे, हगणदारीमुक्त जिल्हा केल्याबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेणाºया जिल्हा परिषद प्रशासनाने मात्र, अंगणवाड्यांतील शौचालयाच्या सुविधेकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. अंगणवाड्यांमध्ये लहान बालकांना सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत थांबावे लागते. तेथे त्यांना पोषण आहार व अनौपचारिक शिक्षण दिले जाते. पाच तासांच्या कालावधीत बालकांना लघुशंका आणि शौचास जावे लागते; पण तेथे शौचालयाची सोय नसल्याने बालकांची मोठी गैरसोय होत असून, त्यांना उघड्यावरच बसावे लागते. अशा परिस्थितीत स्वच्छतेबाबत ही बालके कोणते संस्कार घेत असतील, असा प्रश्न उपस्थित झालाआहे.आजही ३ हजार ४७३ पैकी ११८० अंगणवाड्यांना ‘आयएसओ’ मानांकन मिळाले आहे, तर १००० अंगणवाड्या ‘स्मार्ट’ झाल्या आहेत. जिल्ह्यातील २ हजार ५६१ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत आहे, तर तब्बल ९०० अंगणवाड्यांना स्वत:ची इमारतच नाही. त्या अंगणवाड्या कुठे ग्रामपंचायत इमारतीत, समाजमंदिरात, तर कुठे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये व्हरांड्यात, पारावर, भाड्याच्या खोलीत, मंदिरात चालतात. ८७५ अंगणवाड्यांना शौचालयाची सुविधाच नाही, तर ७२२ अंगणवाड्यांमधील शौचालयांची दुरवस्था झालेली आहे. अंगणवाड्यांमध्ये शौचालये व पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विद्यमान महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी अंगणवाड्यांना पाण्याची व्यवस्था करून देण्याचे आवाहन ग्रामपंचायतींना केले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील ८७५ अंगणवाड्या शौचालयाविनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 1:11 AM