वसमत : वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी रविवारी चुरशीच्या वातावरणात मतदान झाले. १८ संचालक निवडण्यासाठी झालेल्या निवडणुकीत तब्बल ९८.४७ टक्के मतदान झाले. मतमोजणी सोमवारी होणार असून निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. दिवसभर मतदान केंद्रांवर रांगा पहावयास मिळाल्या. वसमत बाजार समितीवर ताबा मिळविण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादीच्या पॅनलमध्ये अटीतटीची लढत झाली. आ.डॉ. जयप्रकाश मुंदडा व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकरांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. त्यामुळे दोघेही सर्व शक्तीनिशी प्रचारात उतरले होते. मतदारांना ओढून आणण्यासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मैदानात उतरले होते. रविवारी वसमत येथील ५ व कुरूंदा येथील २ अशा सात मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. यात ग्रामपंचायत गटात ९८.२९ टक्के, सोसायटी गटात ९८.७६ टक्के, व्यापारी गटात ९७.६८ टक्के, हमाल मापाडी गटात ९८.७९ टक्के एवढे मतदान झाले. एकूण २ हजार ३१६ मतदारांपैकी २ हजार २८१ मतदारांनी मतदाना केले. निवडणुकीतील एकूण मतांची टक्केवारी ९८.४८ टक्के झाली. मतमोजणी सोमवारी बाजार समितीच्या लिलाव कक्षात होणार आहे. (वार्ताहर)कुरूंदा येथे २ बुथवर शांततेत मतदानकुरूंदा: वसमत बाजार समितीच्या निवडणुकीसाठी कुरूंदा येथील दोन बुथवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सोसायटी मतदारसंघात २४५ पैकी २४२ मतदान झाले. तर ग्रामपंचायत मतदारसंघात ३०० पैकी २९६ मतदान झाले. सरासरी ९८ टक्के मतदान झाले आहे. कुरूंदा येथे कुरूंदा, गिरगाव, आंबाचोंढी, पांगरा शिंदे सर्कलमधील ग्रामपंचायत व सोसायटीमधील मतदानाचे बुथ होते. लक्षवेधी लढतीमुळे सर्वांचे लक्ष या भागाकडे होते. त्यामुळे सकाळपासून तालुक्यातील दिग्गज नेत्यांनी येथे तळ ठोकला होता. कुरूंद्यातील व्यापारी मतदारसंघातील मतदान निर्णायक असल्याने सर्वच उमेदवार रात्रीपासून डेरा घालून बसले होते. रात्री उशिरापर्यंत आ. डॉ. जयप्रकाश मुंदडा हे थांबले होते. बुथला माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी भेट दिली. राकाँ व शिवसेनेचे पदाधिकारी दिवसभर तळ ठोकून होते. सपोनि जगन पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सोसायटीत ९८.७७ टक्के तर ग्रा.प. मतदारसंघात ९८.६६ टक्के मतदान झाले. (वार्ताहर)
निवडणुकीत ९८.४७ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2016 11:33 PM