शेंद्रा : औरंगाबाद तालुक्यातील लिंगदरी येथली पाझर तलावातून अवैध पाणी उपसा करणाºया विद्युत मोटारी बंद करा, असा ठराव ग्रामपंचायतीने घेतला. हा ठराव तहसील कार्यालयात दाखल केल्यानंतर मंडळ अधिकारी देवलाल केदारे यांच्या पथकाने शुक्रवारी मोटारी जप्तीची कारवाई केली. यावेळी परिसरातून ९ मोटारी जप्त करण्यात आल्याचे अधिकाºयांनी सांगितले.
औरंगाबाद तालुक्यात दिवसेंदिवस दुष्काळी स्थिती अधिक गंभीर होत आहे. पुढील सात महिने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याचे आव्हान ग्रामपंचायतींसमोर असणार आहे. तलावात उपलब्ध असलेले पाणी नागरिकांना व जनावरांना पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे जिल्हाधिकाºयांचे आदेश आहेत. असे असले तरी लिंगदरी तलावातून काही दिवसांपासून अवैध पाणी उपसा सुरूच आहे.
त्यामुळे लिंगदरी ग्रामपंचायतीने तलावातून सुरू असलेला अवैध पाणी उपसा बंद करण्याचा ठराव घेतला. त्यानंतर तो ठराव तहसील कार्यालयात दाखल केला.
या ठरावाची तात्काळ दखल घेत मंडळ अधिकारी देवलाल केदारे, नायब तहसीलदार कणगुले व तलाठी ठवले यांनी लिंगदरी येथील पाझर तलाव क्रमांक १ येथे संपादित क्षेत्रात जाऊन तलावातून पाणी उपसा सुरू असलेल्या ९ मोटारी जप्त केल्या. पंचांसमक्ष पंचनामा करून जप्त केलेल्या मोटारी व इतर मुद्देमाल पुढील कारवाईसाठी ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिला.