औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) आणि शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय येथील ९ कोटी रुपये खर्चाच्या कामांचा मार्ग निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने मोकळा झाला आहे. यामुळे अनेक महिन्यांपासून रखडलेल्या घाटीतील वसतिगृह, ग्रंथालयाचे फर्निचर आणि शवचिकित्सागृहाच्या इमारतीच्या कामाला अखेर प्रारंभ होणार आहे.
२०११ मध्ये शवविच्छेदन कक्षातील मृतदेह उंदरांनी कुरतडल्याची घटना घडली होती. ही बाब लक्षात घेऊन राज्यातील सर्वच शवविच्छेदनगृहांचे आधुनिकीकरण करण्यासंदर्भात सहयोग ट्रस्टने जनहित याचिका दाखल केली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने राज्यातील शवविच्छेदन कक्षांची सुधारणा करावी, असे निर्देश दिले होते. त्यानुसार घाटी प्रशासनाने शवचिकित्सागृहाच्या इमारतीच्या बांधकामासाठी प्रस्ताव दिला होता. त्यामध्ये ४ कोटी ८८ लाखांच्या अंदाजपत्रकास २२ जानेवारी रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता के. एम. आय. सय्यद म्हणाले, घाटीतील शवचिकित्सागृह, वसतिगृह आणि ग्रंथालयाचे फर्निचर, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील देखभाल-दुरुस्ती या अर्थसंकल्पातील तीन कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यासंदर्भात कार्यादेशदेखील देण्यात आले आहेत. आठवडाभरात कामे सुरू होतील, असे सूत्रांनी सांगितले.
४.८८ कोटींतून नवे शवचिकित्सागृहघाटीतील सध्याच्या शवचिकित्सागृहाच्या जागेतच आॅटोप्सी आॅडिटोरियमसह शवविच्छेदन आणि शवचिकित्सागृहाची नवीन इमारत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ४.८८ कोटींच्या निधीतून नवे शवचिकित्सागृह उभे राहील.
२.३५ कोटींचे फर्निचरघाटीत दोन वर्षांपूर्वी गं्रथालयाची आधुनिक इमारत उभी राहिली. ई-लायब्ररीच्या सर्व सुविधा उभारण्याच्या हेतूने ही इमारत सज्ज करण्यात आली. तसेच पदव्युत्तरच्या जागा वाढल्याने घाटीत नवीन वसतिगृह बांधण्यात आले. या दोन्हीच्या फर्निचरसाठी जानेवारीत निधी आला. मात्र, नवीन फर्निचर निविदा प्रक्रियेच्या फेऱ्यात अडक ले. त्यामुळे दोन वर्षांपासून फर्निचरअभावी ग्रंथालयाची इमारत धूळखात आहे. तसेच फर्निचरशिवाय राहण्याची वेळ पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांवर ओढावली. अखेर निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने २.३५ कोटींतून फर्निचरचे काम सुरू होईल.
२.४ कोटींतून ‘डेंटल’चे नूतनीकरणशासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय दंतोपचारासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे. याठिकाणी २.४ कोटींच्या निधीतून मुख्य इमारतीच्या आतील आणि बाहेरील भागांचे रंगकाम, प्रयोगशाळेतील देखभाल-दुरुस्ती यासह विविध नूतनीकरणाची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे दंत महाविद्यालयाचे स्वरूप आणखी भव्य होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.