औरंगाबाद : शहरातील विविध वसाहतींमधील गांजा विक्रेत्यांना ठोक विक्रीसाठी ओडिशामधून आणलेला तब्बल ९ लाख ४३ हजार ८६० रुपयांचा ४७ किलो १९३ ग्रॅम गांजा पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने बुधवारी रात्री पकडला. केंब्रिज चौकाजवळ सापळा रचून केलेल्या कारवाईत तीन गांजा तस्करांना अटक करण्यात आली.
मुख्य गांजा तस्कर आवेज खान महेमूद खान (२७, रा. मोमीनपुरा), महमद इसा (३५, रा. गरमपाणी ) आणि विजय संजय ठाकरे (२९, रा. अजनाळे, ता. धुळे), अशी त्यांची नावे आहेत. आवेज हा शहरातील अनेकांना ठोक भावाने गांजा विकतो. तो २१ एप्रिल रोजी रात्री कारने गांजा घेऊन येत असल्याची पक्की खबर पोलीस आयुक्तांना मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक राहुल रोडे, पोलीस अंमलदार सय्यद शकील, इमरान खान, ए.आर. खरात, मनोज विखणकर, विजय निकम, अविनाश जोशी, व्ही.एस. पवार आणि चौधरी यांच्या पथकाने केंब्रिज चौक ते चिकलठाणा रस्त्यावर बुधवारी रात्री सापळा रचला. एक संशयित कार पोलिसांना येताना दिसली.
पोलिसांनी कार अडविली. चालक महंमद इद्रीस आणि मुख्य संशयित आवेज खान कारमध्येच पकडलेे. याचवेळी विनानंबरच्या दुचाकीवरून विजय ठाकरे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी पंचांसमक्ष कारची इन कॅमेरा झडती घेतली असता कारमध्ये प्लास्टिकमध्ये गुंडाळून लपवून आणलेला ९ लाख ४३ हजार ८६० रुपये किमतीचा ४७ किलो १२३ ग्रॅम गांजा आढळला. ओडिशामधील सल्लेरू (ता. अपुदर) येथून तेलंगणामार्गे गांजा आणल्याची कबुली आरोपींनी दिली. आरोपींविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. या कारवाईत गांजा, कार, दुचाकी, रोख, मोबाइल, असा सुमारे १५ लाख ४९ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आवेज खान मुख्य तस्करआरोपी आवेज खान हा शहरातील गांजा विक्रेत्यांना होलसेल दराने गांजा विक्री करतो. त्याने अन्य साथीदारांच्या मदतीने यापूर्वीही ओडिशामधून गांजा आणल्याचे समोर आले. नारेगाव, चमचमनगर येथे तो हा गांजा नेणार होता.
ओडिशा, तेलंगणातील गांजा सर्वाधिक कडकसूत्राने सांगितले की, देशातील विविध ठिकाणी उत्पादित गांजापेक्षा ओडिशा, तेलंगणा राज्यातील गांजामध्ये सर्वाधिक ३५ टक्क्यांपर्यंत अधिक नशा असते. यामुळे ओडिशाच्या गांजाला शहरातील नशेखोरांकडून सर्वाधिक मागणी असते. यामुळे औरंगाबाोत बहुतेक ओडिशा आणि तेलंगणामधील गांजा विक्री होतो.