: एमआयडीसी वाळूज पोलिसांची कामगिरी; सव्वासहा लाखांचा मुद्देमाल जप्त
: एमआयडीसी वाळूज पोलिसांची कामगिरी; सव्वासहा लाखांचा मुद्देमाल जप्त
वाळूज महानगर : उद्योगनगरीतील लुनावत ऑटो कंट्रोल सिस्टिम कंपनीतून ९ लाखांचे साहित्य लांबविणाऱ्या चोरट्यास एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अवघ्या २४ तासांत जेरबंद केले. आरोपी आकाश प्रल्हाद भालेराव (२१, रा.जोगेश्वरी) याच्या ताब्यातून ६ लाख ३० हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले. फरार तिघा आरोपींचा शोध सुरू आहे.
लुनावत ऑटो कंट्रोल सिस्टिम या कंपनीचे रविवारी (दि.४) रात्री शटर उचकटून चोरट्यांनी ९ लाखांचे साहित्य लांबविले होते. कंपनी मालक कोमलकुमार लुनावत यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिसांनी मंगळवारी जोगेश्वरीत छापा मारून संशयित आरोपी आकाश प्रल्हाद भालेराव यास जेरबंद केले. तीन साथीदारांच्या मदतीने या कंपनीत चोरी केल्याची कबुली दिली. चोरलेले साहित्य छावणीतील भंगार विक्रेत्याला विकल्याचे आकाशने पोलिसांना सांगितले.
पोलीस पथकाने छावणीत छापा मारला. भंगार विक्रेता आरीफ सय्यद खुर्शीद (रा. छावणी परिसर) याच्या दुकानातून ६ लाख ३० हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले असून, त्यास अटक करण्यात आली. या चोरी प्रकरणातील फरार तिघा आरोपींचा शोध सुरू आहे.
सीसीटीव्ही फुटेजवरून चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
या कंपनीत चोरी करताना चार चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. तीन तास कंपनीतील साहित्य घेऊन जातांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याने त्यांना टिपले होते. यावरून पोलिसांनी सापळा रचून आकाश भालेराव यास जेरबंद केले. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त निकेश खाटमोडे-पाटील, सहा.आयुक्त विवेक सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार, सहा. निरीक्षक गौतम वावळे, पोहेकॉ. कय्युम पठाण, पोना. फकीरचंद फडे, संजय हंबीर, प्रकाश गायकवाड, पोकॉ. विनोद परदेशी, अविनाश ढगे, रेवननाथ गवळे, गणेश पाटील, दीपक मतलबे, चालक बबलू थोरात यांनी ही कामगिरी पार पाडली.
फोटो ओळ- लुनावत ऑटोमेशन कंपनीत चोरी करणारा आरोपी आकाश भालेराव आणि पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक गौतम वावळे.
-------------------------------