तालुक्यांत कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या समन्वयाची जबाबदारी
----
औरंगाबाद : जिल्ह्यात ९ तालुक्यांत कोरोनाचे संक्रमण वाढल्याने कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नऊ तालुक्यांना समन्वयासाठी जि.प. मुख्यालयातील अधिकारी संपर्क अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांनी नेमले आहेत. ते रविवारी नेमलेल्या तालुक्यांत दौरा करून परिस्थितीचा आढावा घेणार असल्याची माहीती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांनी दिली.
कोरोना रुग्ण आढळल्यावर आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून संशयित शोधणे, संपर्कातील लोक शोधणे, त्यांचे तपासणीसाठी स्वॅब घेणे, रुग्ण दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करणे, मंगल कार्यालये, कोचिंग क्लासेस, सर्व शाळा महाविद्यालये, हाॅटेल्स, धार्मिकस्थळे, उद्यानांच्या ठिकाणी वेळोवेळी भेट देऊन प्रमाणापेक्षा अधिक लोक असतील, तर त्यांना आधी ताकीद, दंडात्मक कारवाई करून, तरीही सुधारणा न झाल्यास गुन्हा दाखल करण्याचा स्पष्ट उल्लेख नोटिसीत द्यावा. परिसर १५ दिवस सील करण्याची कारवाई अधिकार क्षेत्रात करावी. भाजी मंडई, दुकानांच्या ठिकाणी अंतर पाळणे, मास्क, ठरावीक अंतराने तपासणी करून घ्यावी. खासगी डाॅक्टरांची स्थानिक यंत्रणांसोबत बैठक घेऊन लक्षणे असलेल्या लोकांची तपासणी करून घेण्यासाठी सूचना द्याव्यात. कोविड केंद्र, रुग्णालयांतील व्यवस्था, यंत्र साधनसामुग्रीची खात्री करून घ्यावी. जेवण, वीज, पाणी व्यवस्था नियमित असल्याची खात्री करावी. आवश्यक औषधे, सुरक्षा साधनांच्या उपलब्धतेवर लक्ष द्यावे, तसेच महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील, ग्रामसेवक, पंचायत समिती गणाचे संपर्क अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यावर गोंदावले यांनी सोपविली आहे.
--
संपर्क अधिकारी आज दौऱ्यावर
--
सूरजप्रसाद जयस्वाल- गंगापूर, डॉ.बी. बी. चव्हाण-पैठण, आनंद गंजेवार- वैजापूर, प्रसाद मिरकले-फुलंब्री, बी.डी. पाटील-कन्नड, एस.एम. बुब-औरंगाबाद, डॉ.सुनील भोकरे-खुलताबाद, डॉ.रत्नाकर पेडगांवकर-सोयगांव, शिवराज केंद्रे-सिल्लोड, यांची नियुक्ती तालुका संपर्क अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. नियुक्त अधिकारी रविवारी जिल्ह्यातील ९ तालुक्यांच्या दौऱ्यावर असणार असून, त्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करतील.