छत्रपती संभाजीनगर: जय बाबाजी परिवारांच्या आग्रहावरून नाशिकलोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची घोषणा स्वत: महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केली. यासोबतच छत्रपती संभाजीनगर,जालना ,अहमदनगर, दिंडोरी, शिर्डी, जळगाव आणि धुळे या लोकसभा मतदारसंघातील चारित्र्यवान उमेदवारांना जय बाबाजी परिवार पाठिंबा देणार असल्याचे शांतिगिरी महाराजांनी सांगितले.
शांतिगरी महाराज म्हणाले की, लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा या टॅगलाईनखाली आपण पहिल्यांदा सन २००९ मध्ये आपण छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती. राजकारणात चांगली माणसे आली पाहिजे, अशी आपली भूमिका आहे. ही भूमिका भक्तमंडळींना आवडल्याने त्यांनीच यावर्षी नाशिक लोकसभा मतदार संघातून निवडूणक लढविण्याचा आग्रह धरला. भक्त परिवार मोठा असल्याने आपण ही निवडणूक लढविणार आणि जिंकणार आहे. सत्ताधारी भाजप आणि शिवसेना दोन्ही गट हे हिंदूत्ववादी पक्ष आहेत. या पक्षांकडेच का उमेदवारी मागत नाही अथवा तुम्ही तुमचा राजकीय पक्षच का स्थापन करीत नाही, याप्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, मोठ्या राजकीय पक्षांनीच आपल्याला उमेदवारी द्यावी, अशी भक्तांची मागणी आहे.
पण त्यांच्या उमेदवारीची अपेक्षा न ठेवता अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. तसेच जय बाबाजी परिवार हाच आपला राजकीय पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. मागील पंधरा वर्षात आपण लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकीसाठी चांगल्या चारित्र्यावान उमेदवारांना पाठिंबा दिला होता.यावर्षीही आपले भक्तगण जास्त असलेल्या आठ लोकसभा मतदार संघातील उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय पक्षांवर दबाव टाकण्यासाठी तुम्ही उमेदवारी घोषित केली का असे विचारले असता ते म्हणाले की, आम्हाला कोणावरही दबाव टाकण्याची गरज नाही, आम्ही केवळ चांगले लोक राजकारणात यावे, यासाठी प्रयत्न करीत असल्याचे शांतिगिरी महाराज म्हणाले. या पत्रकार परिषदेला जय बाबाजी भक्त परिवाराचे राजेंद्र पवार यांची उपस्थिती होती.निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमजयबाबाजी भक्त परिवाराच्यावतीने रविवारी शहरातील संत एकनाथ रंगमंदीरात जिल्ह्यातील भक्तांना निवडणूकींच्या अनुषंगाने प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. स्वत: शांतिगिरी महाराज यांनी यावेळी मार्गदर्शन केले.