औरंगाबाद : शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीचे भविष्यात औरंगाबाद महापालिकेच्या राजकारणावर काय परिणाम होतील, यावरही खल सुरू झाला आहे. महापालिका हद्दीतील दोन आमदार शिंदे यांच्यासोबत असले तरी शिवसेनेचे ९० टक्के नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार आहेत. बोटावर मोजण्याएवढे पाच ते सहा नगरसेवक शिंदे गटाकडे जाऊ शकतात, असाही अंदाज पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी वर्तविला.
दोन महापौरांचा अपवाद वगळता महापालिकेवर शिवसेना-भाजपनेच अधिराज्य गाजवले. एप्रिल २०२०मध्ये मनपाची निवडणूक होणार होती. कोरोना संसर्ग, सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणामुळे निवडणूक लांबत गेली. अडीच वर्षे झाली, माजी नगरसेवक, इच्छुक चातकाप्रमाणे निवडणुकीची वाट पाहत आहेत. त्यातच मंगळवारी राज्याच्या महाविकास आघाडीतील शिवसेना आमदारांचा मोठा गट घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले. याचे औरंगाबाद महापालिकेत काय परिणाम होणार, याची चाचपणी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केल्याचे कळते. ९० टक्के नगरसेवकांचा कल उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहण्याकडे आहे. मागील काही वर्षांपासून प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाठ यांच्यासोबत जास्त वेळ राहणारे पाच ते सहा नगरसेवक भविष्यात शिंदे गटासोबत जाऊ शकतात. शिवसेनेच्या काही नगरसेवकांशी संवाद साधला असता, त्यांनी काहीही झाले तरी उद्धव ठाकरे यांच्यासाेबतच राहण्याचा निर्धार व्यक्त केला. शिवसेनेवर जेव्हा जेव्हा ‘प्रहार’ झाले, तेव्हा शिवसेना तेवढ्याच ताकदीने उभी राहिली आहे. संकट, संघर्ष, गद्दारी, बंडखोरी हे शब्द शिवसेनेच्या पाचवीला पुजलेले आहेत, अशा भावना काही नगरसेवकांनी व्यक्त केल्या.
निवडणूक डोळ्यासमोरऔरंगाबाद महापालिका निवडणूक सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होईल, असा कयास सर्वच पक्षांचे इच्छुक, माजी नगरसेवक लावत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना सोडण्याची इच्छा कोणाचीही नाही. आजच्या परिस्थितीत शिवसेना सोडल्यास राजकीय आत्महत्या होईल, असे अनेकांचे मत आहे.
कोण काय म्हणाले...- मकरंद कुलकर्णी - शिवसेना या चार अक्षरांमुळे माझी ओळख, मी उद्धव साहेबांच्या पाठीशी.- सीमा खराम - अलीकडेच माझे पती गणपत खरात हृदयविकाराने गेले. रुग्णालयात जाण्यापूर्वी त्यांनी अंगावरील सर्व दागिने काढले. शिवबंधन शेवटपर्यंत त्यांच्या हातात होते.- शिल्पाराणी वाडकर - आमच्यावर बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार असून, आम्ही नेहमीच शिवसेनेसोबत राहणार.- सिद्धांत शिरसाट - कोणीही शिवसेना सोडलेली नाही. सर्वजण मिळून बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत. कडवट हिंदुत्व आहे त्यांच्यात. मी शिवसेनेसोबतच आहे. उद्धव ठाकरे यांना नेता मानतो, शेवटी ते पक्षप्रमुख आहेत.
२०१५ मनपा निवडणुकीची स्थितीशिवसेना - २८ - चिन्हावर निवडून आलेलेशिवसेना समर्थक - ०५ - सत्तेतही पाठिंबा