लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्याचे खरीप पिकाखालील क्षेत्र ४९ लाख ११ हजार हेक्टर असून, त्यापैकी ४४ लाख १९ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. हेक्टरनिहाय पीक पेरणीचा खर्च सूत्रानुसार अंदाज बांधला तर खरीप हंगामात नांगरणी, पेरणी, मजुरी, बियाणे, लागवड, फवारणी, खतांच्या खरेदीसाठी करण्यात आलेली अंदाजे ८ ते ९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक संकटात आली आहे.मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आणि काही प्रमाणात उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यांत अपेक्षित पावसापेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामाची दुबार पेरणी करणेही अवघड असून, दुष्काळाच्या उंबरठ्यावर मराठवाडा उभा आहे. येत्या काही दिवसांत अपेक्षित पाऊस झाला नाही, तर परिस्थिती आवाक्याबाहेर जाण्याची चिन्हे आहेत. आॅगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झालेला आहे. या महिन्यात दुबार पेरणी कशी करणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असताना कृषी विभागाने मराठवाड्यात दुबार पेरणीचे संकट असल्याचा अहवाल विभागीय प्रशासनाला गेल्या आठवड्यात दिला आहे. विभागात मक्याची २ लाख ३५ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. कापूस १४ लाख ३२ हजार हेक्टर (बोंडअळीच्या संकटाने पीक धोक्यात), तूर ४ लाख ३३ हजार हेक्टर, मूग १ लाख ६२ हजार हेक्टर, उडीद १ लाख ४५ हजार हेक्टर, सोयाबीन १७ लाख ५१ हजार हेक्टर, बाजरी १ लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. या सर्व पिकांना पावसाची आवश्यकता आहे. या सर्व पिकांच्या पेरण्याचा खर्च वेगवेगळा असतो. यातील मका, कापूस, सोयाबीन पेरणीचा खर्च जवळपास सारखाच असतो. कडधान्य व बाजरी पेरणीचा खर्च तुलनेने थोडा कमी येतो.१५ ते २० हजारांचा हेक्टरी खर्चनांगरणीसाठी २५०० रुपये हेक्टरी खर्च झाला आहे. मोगडण्यासाठी १२५० रुपये, चरी पाडण्यासाठी १२५० रुपये, ५ हजार रुपयांचे बियाणे हेक्टरी लागते. निंदण्यासाठी ३ हजार ७५० रुपये हेक्टरी खर्च झाला आहे. १०:२६ च्या खतांच्या दोन बॅगा हेक्टरी लागल्या आहेत.
शेतीची ९ हजार कोटींची गुंतवणूक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 1:40 AM