अपुरा पुरवठा : दिवसभरात ३ हजार ८५७ जणांना लस
औरंगाबाद : शासनाकडून मुबलक लस मात्रा उपलब्ध होत नसल्याने बुधवारी शहरात ३ हजार ८५७ नागरिकांनाच डोस मिळाले. दुपारनंतर महापालिकेचे सर्व केंद्र लस संपल्याने बंद करण्यात आले होते. रात्री उशिरा महापालिकेला ९ हजार डोस प्राप्त होणार आहेत. त्यामुळे बुधवारी शहरात ६२ केंद्रात डोस देण्याचे नियोजन महापालिकेकडून करण्यात येत आहे; मात्र हे डोस फक्त दुसऱ्या टप्प्यातील नागरिकांसाठी आहेत.
महापालिकेला रविवारी रात्री १३ हजार डोस मिळाले होते. सोमवारी १० हजार नागरिकांना डोस देण्यात आले. मंगळवारी ३ हजार ३ नागरिकांना डोस दिले. १८ ते ४४ वयोगटातील ८४९ जणांना लस देण्यात आली. महापालिकेकडील लसचा साठा मंगळवारी संपला. ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना देण्यासाठी महापालिकेकडे डोसच उपलब्ध नाहीत. रात्री उशिरा महापालिका प्रशासनाला ९ हजार डोस प्राप्त होणार आहेत. त्याचे नियोजन करणे सुरू होते. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना सहा केंद्रांवर दुसरा डोस देण्यात येईल. त्यासाठी नागरिकांना ॲपवर नोंदणी करणे बंधनकारक नाही. एका केंद्रावर फक्त दोनशे नागरिकांना डोस देण्याची व्यवस्था आहे. या ठिकाणी कोव्हॅक्सिन लस आहे.