औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत ९२ आठवडी बाजार भरतात. त्यांची वार्षिक उलाढाल ३०० ते ३५० कोटींहून अधिक आहे. तिसऱ्या टप्प्यातील ग्रामीण भागातील कोरोना निर्बंध थोडे शिथिल होऊन बाजारपेठ मर्यादित वेळेसाठी खुली झाली तरी प्रशासनाने आठवडी बाजार भरविण्यास परवानगी न दिल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे.
कोरोना रुग्णसंख्येला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १३ मार्चपासून जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद केले. जिल्ह्यात ९ तालुक्यांतून ९२ आठवडी बाजार भरतात. प्रत्येक आठवडी बाजारात कमीत कमी २ लाख ते १० लाख दरम्यान उलाढाल होत असते. गावाचे संपूर्ण अर्थकारण या आठवडी बाजारावर अवलंबून असते. मात्र, गेल्या १४ आठवड्यांपासून आठवडी बाजार बंद आहेत. या सर्व आठवडी बाजारांची मिळून वार्षिक ३०० ते ३५० कोटी दरम्यान उलाढाल होत असते. आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने आठवडी बाजार सुरू करण्यास परवानगी दिली नाही. यामुळे ग्रामीण अर्थचक्र बिघडले आहे.
चौकट
विक्रेते बेहाल
आठवडी बाजारात शेकडो विक्रेते आपला व्यवसाय करतात. यातील भाजी विक्रेते, फरसाण, लोणचे, कटलरी, कपडे, शेती अवजारे विक्रेत्यांमध्ये बहुतांश परंपरागत व्यवसाय करणारे आहेत. हे विक्रेते आठवडी बाजारातच आपले व्यवसाय करतात. मागील तीन महिन्यांपासून आठवडी बाजार बंद असल्याने या विक्रेत्यांचे बेहाल झाले आहेत.
चौकट
हजारोचा धंदा बुडाला
आम्ही आठवडी बाजारातच फरसाण विक्रीचा व्यवसाय करतो. खानदानी व्यवसाय आहे. बाजाराच्या एका दिवसात १० ते १२ हजार रुपयांची उलाढाल होत असे. आता रस्त्यावर हजार रुपयाचा धंदा होणे कठीण झाले आहे.
राजू जैस्वाल
फरसाण विक्रेता
चौकट
लवकर आठवडी बाजार भरावा
मुंबईहून जुने टीव्ही आणून ते मोंढ्यातील रविवारच्या आठवडी बाजारात विक्री करण्याचा व्यवसाय मी करतो. आठवडी बाजार बंद असल्याने आम्ही उधारीवर दिवस काढत आहे. लवकरात लवकर आठवडी बाजार सुरू करण्यास परवानगी द्यावी.
इम्रान खान
जुने टीव्ही विक्रेता
-------
सिल्लोड तालुक्यात कोट्यवधीची उलाढाल ठप्प
सिल्लोड तालुक्यात १३ आठवडी बाजार भरतात. मागील एप्रिल महिन्यापासून आठवडी बाजार बंद आहे. यामुळे तालुक्यातील कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली आहे. आठवडी बाजार उघडण्यासंदर्भात प्रशासनाकडून अजून परवानगी आली नाही.
अजगर पठाण
प्रशासकीय अधिकारी, सिल्लोड नगरपरिषद
चौकट
जिल्ह्यात वारानुसार आठवडी बाजारांची संख्या
रविवार --- १७
सोमवार--- ११
मंगळवार-- ११
बुधवार -- १४
गुरुवार -- १७
शुक्रवार -- १२
शनिवार -- १०
----
आठवडी बाजार बंदच
जिल्हा प्रशासनाने संपूर्ण बाजारपेठ अनलॉक केली असली तरी अजूनही आठवडी बाजाराविषयी निर्णय घेतला नाही. पुढील आदेश येईपर्यंत आठवडी बाजार सुरू होणार नाहीत.