औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांच्या १८ जागांसाठी आज सकाळी आठ ते चार या वेळेत ९३.९० टक्के मतदान झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बारहाते यांनी दिली.
संदीपान भुमरे आणि किरण पाटील डोणगावकर हे याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. वैयक्तिक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज आल्याने या जागेसाठी मतदान झाले नाही.
क्रांती चौकातील विभागीय सहनिबंधक कार्यालयात दोन मतदान केंद्र व प्रत्येक तालुक्यात एक मतदान केंद्र याप्रमाणे एकूण दहा केंद्रांवर मतदान झाले. एकूण अकराशे १४ मतदारांपैकी ६४६ मतदारांनी मतदान केले. फुलंब्री मतदान केंद्रावर व औरंगाबादच्या मतदान केंद्रावर पीपीई कीट घालून दोन मतदारांनी मतदान केले.
सकाळी आठ ते दहा या वेळेत ३२१, सकाळी दहा ते बारा या वेळेत ४५९, दुपारी १२ ते २ या वेळेत २२३ व दुपारी दोन ते चार या वेळेत ४३ मतदारांनी मतदान केले.
औरंगाबाद केंद्र क्रमांक एकवर ६०.७८, केंद्र क्रमांक दोन वर ९८.९१, खुलताबाद ९७.२२ फुलंब्री - १०० टक्के , सिल्लोड - ९९.५ टक्के सोयगाव- १०० टक्के कन्नड - ९८.६२ टक्के, पैठण - १०० टक्के , गंगापूर- ९९.१७ टक्के, वैजापूर ९९.३१ टक्के याप्रमाणे एकूण मतदान झाले.
उमेदवार व नेत्यांची गर्दी
विभागीय सहनिबंधक कार्यालयातील दोन मतदान केंद्रांवर सकाळपासूनच उमेदवार, त्यांचे समर्थक व पॅनलच्या नेत्यांची गर्दी बघावयास मिळाली. शेतकरी सहकार बँक विकास पॅनलचे सुभाष झांबड सकाळपासूनच येथे तळ ठोकून होते. चंद्रकांत खैरे हे या केंद्रावर दोन तास थांबले. शेतकरी विकास पॅनलचे आ. हरिभाऊ बागडे, आ. सतीश चव्हाण, आ. अंबादास दानवे, नितीन पाटील यांच्यासह त्यांचे समर्थक उपस्थित होते. उमेदवार जगन्नाथ काळे, रवींद्र काळे, एकनाथ जाधव आदींचीही याच केंद्रावर उपस्थिती होती.
निवडणुकीत रंगत आली...
दरवेळेपेक्षा यावेळी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चांगलीच रंगात आली, अशी चर्चा ऐकावयास मिळत होती. दरवेळी निवडणूक येते कधी, जाते कधी हे समजत नव्हते. यावेळी दोन पॅनल उभी राहिल्याने निवडणुकीत रंगत भरली व आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.
चौकट..
आज मतमोजणी
उद्या दिनांक २२ मार्च रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात मतमोजणी सुरू होईल. दुपारी दोन वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येईल, असे मुकेश बारहाते यांनी सांगितले.