सिल्लोड शहर व तालुक्यात प्राथमिकच्या २४६ शाळा आहेत, तर प्राथमिक व माध्यमिकच्या १६० शाळा आहेत. अशा एकूण ४०६ शाळा आहेत. रविवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बैठक घेऊन शाळा सुरू करण्याचे तोंडी निर्देश दिले. मात्र सिल्लोड तालुक्यातील शाळांना सोमवारी दुपारपर्यंत लेखी आदेशच मिळाले नाहीत. केवळ तोंडी आदेश आले होते. यामुळे शिक्षक व मुख्याध्यापकांमध्ये संभ्रम होता.
शाळा सुरू करण्याबाबत अटी व शर्ती काय आहेत, याची जाणीव नसल्याने काही शिक्षकांनी सोमवारी शाळा भरवल्याच नाहीत तर काही शिक्षकांनी शाळेची साफसफाई, दुरुस्ती करून घेतली. सोमवारपासून शाळा सुरू होत असल्याच्या बातम्या आल्या असल्या तरी बच्चे कंपनीने पहिल्या दिवशी शाळेत जाणे टाळले. हेही एक त्याचे कारण असू शकते. शिक्षकांना आदेश न मिळाल्याचा बहाणा मिळाला तर विद्यार्थ्यांना पोळ्याचा बहाणा मिळाला. कारण काहीही असो मात्र पहिल्या दिवशी शाळा सुरू करण्याच्या मोहिमेचा तालुक्यात फज्जा उडाला.
कोट...
तोंडी आदेश दिले होते
शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना व लेखी आदेश सोमवारी दुपारपर्यंत आले नव्हते; मात्र तोंडी आदेश होते. तालुक्यातील शिक्षक व मुख्याध्यापकांना सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबत आम्ही तोंडी आदेश दिले होते; मात्र तालुक्यातील काही शाळा सुरू झाल्याच नाहीत. तोंडी सूचनेने तालुक्यातील केवळ २० ते २५ शाळा सुरू झाल्या होत्या. मात्र काही शिक्षकांनी शाळेची साफसफाई करून घेतली. आता मंगळवारपासून सर्व शाळा १०० टक्के सुरू होतील.
- व्यंकटेश कोमटवार, गटशिक्षणाधिकारी, सिल्लोड