मराठवाड्यातील ९५ विद्यार्थी युक्रेनमध्येच; अनेकांनी गाठली हंगेरी, पोलंड, राेमानियाची सीमा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 12:33 PM2022-03-02T12:33:51+5:302022-03-02T12:34:12+5:30
रशिया-युक्रेनमध्ये युद्ध भडकल्यामुळे तिकडे शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना काळजीने ग्रासले आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यातील १०९ विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले असून त्यातील १४ विद्यार्थी आतापर्यंत परतले आहेत. ९५ विद्यार्थी युक्रेनमध्येच अडकले असून त्यातील काही जणांनी हंगेरी, रोमानिया, पोलंडच्या सीमेपर्यंत प्रवास केला आहे. विभागीय प्रशासनाकडून मंगळवारी उशिरापर्यंत एवढीच माहिती कळू शकली. अडकलेल्यांपैकी काही जण बुधवारी भारतात येतील, रात्रीपर्यंत आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ शकतील.
रशिया-युक्रेनमध्ये युद्ध भडकल्यामुळे तिकडे शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना काळजीने ग्रासले आहे. सहा दिवसांपासून पालकांची झोप उडाली असून ते मुलांच्या संपर्कात असून ख्याली-खुशाली विचारत आहेत. युक्रेनमधील व्हिनयस्टा, युझोर्ड, ओबॅस्क, ओडेसा, किव्ह, लिव्ह, जॉर्जिया आदी ठिकाणच्या विद्यापीठांत वैद्यकीय शिक्षणासाठी मराठवाड्यातील विद्यार्थी आहेत. रशियाकडून राजधानी कीव्हसह विविध ठिकाणी क्षेपणास्त्रांनी हल्ले होत आहेत. अनेक इमारतींचे नुकसान झाले, रस्ते खचले आहेत. त्यानंतर भारतीय मुलांना सुरक्षित स्थळी हलविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे काही मुलांनी पालकांना कळविले आहे.
लातूरचे ऋतुजा देशमाने, वेदांत शिंदे, परभणीतील संजीवकुमार इंगळे, जालन्यातील किरण भांडारी, संकेत उखर्डे, तेजस पंडित, सुयोग धनवाई, नांदेडमधील स्नेहा महाबळे, प्रशांत नरोटे, तेजस गायकवाड, संजीवनी वन्नाळीकर, सत्यम गवळी, दीपक काकडे, उस्मानाबादची केतकी कोकाटे, असे १४ जण रविवारी परतले. सोमवार, मंगळवार या दोन दिवसांत कुणी आले नाही. बुलडाणा जिल्ह्यातील एक विद्यार्थी विमानाने औरंगाबादेत परतला.
सॉफ्टवेअर इंजिनिअरचे कुटुंब सुरक्षित
मूळचे औरंगाबादचे; परंतु पुण्यात राहणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरसह त्यांचे चार सदस्यीय कुटुंब युक्रेनमध्ये अडकले आहे. त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. परंतु काही विद्यार्थ्यांसह ते एका फ्लॅटमध्ये असल्याची माहिती आहे.
मराठवाड्यातील युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी
औरंगाबाद : १२
जालना : ८ (४ परतले)
परभणी : ६ (१ परतला)
हिंगोली : ७
नांदेड : ३७ (६ परतले)
बीड : ३
लातूर : ३१ (२ परतले)
उस्मानाबाद : ५ (१ परतला)
एकूण : १०९ (१४ परतले)