खुलताबाद: तालुक्यातील तिसगाव येथील आदिवासी आश्रम शाळेमध्ये ९६ विद्यार्थ्यांना आज सकाळी दुधातून विषबाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. सर्व विद्यार्थ्याना वैद्यकीय उपचारासाठी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ आणि ग्रामीण रुग्णालय खुलताबाद येथे दाखल करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, मौजे तिसगाव येथील निवासी आदिवासी आश्रम शाळा आहे. आज सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांना दूध देण्यात आले होते. हे दूध पिताच विद्यार्थ्यांना मळमळ उलट्या जुलाब यासारख्या त्रास जाणवू लागला. काही विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली होती. शाळा प्रशासनाने तातडीने ९६ विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय खुलताबाद आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ येथे वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले. सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.
वरिष्ठांना माहिती दिली याबाबत वरिष्ठांना कळवले आहे. संबंधितांवर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने पुढील कारवाई करण्यात येईल. - विलास कटारे, मुख्याध्यापक, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा तिसगाव
प्रकृती स्थिरदाखल विद्यार्थ्यांवर औषधोपचार सुरू करण्यात आलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांची तब्येत आता स्थिर आहे.- दिपाली भांदुके, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ
त्वरित कारवाई करावी येथे देखरेख करण्यासाठी भक्कम यंत्रणा नाही. गरीब विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार असून जबाबदारांवर त्वरित कारवाई करावी. - सतीश देवेंद्र लोखंडे, प्रदेश युवा संघटनमंत्री, आम आदमी पार्टी