छत्रपती संभाजीनगर : अजिंठा अर्बन को-ऑप. बँकेतील ९७ कोटी ४१ लाख रुपयांच्या घोटाळाप्रकरणी बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) प्रदीप एकनाथ कुलकर्णी यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. न्यायालयाने कुलकर्णी यांना ५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.
अजिंठा अर्बन बँकेत संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळल्यानंतर आरबीआयने बँकेच्या व्यवहारांवर बंदी घालून जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश पंडित काकडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. प्रशासकांना बँकेेच्या लेखापरीक्षणात नेटवर्थ रक्कम व सी. आर. ए. आर. (भारित मालमत्ता प्रमाण) मध्ये मोठा फरक आढळून आला. तसेच ३६ कर्जदारांना ६४ कोटी ६० लाखांचे असुरक्षित कर्ज वाटप केल्याचे आढळून आले. ही बाब २३ डिसेंबर २०२२ रोजी आरबीआयला पाठवलेल्या पत्रात बँकेने मान्य केले होते. बेकायदा कर्जवाटप, इतर बँकांतील ठेवीच्या खोट्या नोंदी, खोटे ताळेबंद प्रमाणपत्र आणि आरबीआयला पाठविण्यात आलेला खोटा लेखापरीक्षण अहवाल, या मुद्यांवरून प्रशासकांनी तक्रार दाखल केली होती. २००६ ते २०२३ दरम्यान ६४.६० कोटी रुपयांची मुदतठेव बँकेच्या लेजर बुकमध्ये खोटी व बनावट नोंद दाखवली. तसेच ३२.८१ कोटी बँकेची रक्कम तीन बँक खात्यात जमा असल्याचे बनावट प्रमाणपत्र दाखवून ताळेबंद तयार केला होता.
कुलकर्णी यांची पाचवी अटक१८ ऑक्टोबर, २०२३ रोजी याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड, अंमलदार विजयानंद गवळी, सुनील फेपाळे याप्रकरणी तपास करत आहेत. त्यानंतर यात पहिली अटक सनदी लेखापाल सतीश मोहरे यांना करण्यात आली होती. त्यानंतर तीन शाखांच्या तीन व्यवस्थापकांना अटक करण्यात आली. कुलकर्णी यांचे अटकपूर्व जामिनासाठीचे प्रयत्न निष्फळ ठरले. शुक्रवारी पथकाने त्यांना अखेर अटक केली.