औरंगाबाद : डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे डिझेलचा कमीत कमी वापर व्हावा आणि प्रदूषण कमी व्हावे, या हेतूने एसटी महामंडळाने इलेक्ट्रिक बससाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. बसफेऱ्यांचे नियोजन (नियते) तयार करण्याचे आदेश महामंडळाने सर्व जिल्ह्यांतील विभाग नियंत्रकांना पाठवले आहेत. त्यानुसार औरंगाबाद विभागानेही तयारी केली असून, जिल्ह्यात ९८ बसेस विजेवर धावणार आहेत.
तोट्यात असलेले एसटी महामंडळ राज्यात २ हजार इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर चालविणार आहे. औरंगाबादेत चार्जिंग स्टेशन उभारण्यासंदर्भात नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे एसटी म्हटली की, फक्त डिझेलची बसगाडी, हे चित्र लवकरच इतिहासजमा होईल. एसटी महामंडळाच्या प्रवाशांना लवकरच इलेक्ट्रिक बसमधून प्रवास करण्याचा अनुभव घेता येणार आहे.
------
या मार्गावर धावणार बसेस
औरंगाबादेतून पहिल्या टप्प्यात पुणे मार्गावर इलेक्ट्रिक बस चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे, तर दुसऱ्या टप्प्यात लातूर, बीड, बुलडाणा, धुळे या मार्गावर या बसेस चालविण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळातर्फे देण्यात आली.
------
आणखी एक ते दीड वर्षे लागणार
- एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस येण्यासाठी किमान एक ते दीड वर्षे लागण्याची चिन्हे आहेत.
- या बसेस टप्प्याटप्प्यांत दाखल होतील. प्राप्त होणाऱ्या बसेसनुसार त्या विविध मार्गांवर चालविण्यात येणार आहेत.
- इलेक्ट्रिक बसची प्रतीक्षा करीत एसटी महामंडळाच्या प्रवाशांना सध्याच्या डिझेल बसेसमधूनच प्रवास करावा लागणार आहे.
----
कोठे होणार चार्जिंग स्टेशन
- एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयाच्या पाठीमागील जागेत चार्जिंग स्टेशन करण्याचे नियोजन झाले आहे.
- इलेक्ट्रिक बस एकदा चार्जिंग केल्यानंतर ४०० कि. मी. अंतर प्रवास शक्य होणार आहे. परंतु ३०० कि. मी. अंतरावरच चार्जिंगची व्यवस्था करण्यावर भर दिला जात आहे.
- चार्जिंग स्टेशन उभारणीला लवकरच गती मिळण्याची शक्यता आहे. यासाठी महावितरण एसटी महामंडळाला मदत करणार आहे.
-------
खर्चात होणार बचत
कोरोना काळात एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. डिझेलसाठीही पैसे नसल्याची परिस्थिती अनेक आगारांची झाली होती. त्यामुळे
इलेक्ट्रिक बस आल्याने इंधन खर्चात बचत आणि प्रदूषण कमी अशा दुहेरी फायद्याची अंमलबजावणी लवकरच केली जाणार आहे.
----
नियोजन सुरू
पहिल्या फेजमध्ये पुणे, तर दुसऱ्या फेजमध्ये बुलडाणा, बीड, धुळे, लातूर या मार्गांवर इलेक्ट्रिक बस चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विभाग नियंत्रक कार्यालय परिसरात चार्जिंग स्टेशन होईल.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक