औरंगाबाद : कोरोनाची लागण झाल्यानंतर पटकन नागरिक तपासणी करीत नाहीत. उशिराने तपासणी केल्यानंतर निदान करणे खूपच अवघड होत आहे. आठ ते दहा दिवस उशिराने आलेल्या रुग्णांची प्रकृती गंभीर हाेत आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर लावल्यानंतरही रुग्ण बरे होत नाहीत. ५० पेक्षा जास्त वय असलेल्या आणि विविध आजार असलेल्या रुग्णांवर यशस्वी उपचार करणे अशक्यप्राय ठरत आहे. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतरही शहरात वर्षभरात ९८२ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले.
मागील वर्षभरात शहरातील ४५ हजार ७३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले १३ हजार ६७ नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले. ताप, सर्दी, खोकला आणि श्वास घेताना त्रास होत असेल तर अनेक रुग्ण तपासणीचा कंटाळा करतात. श्वास घेण्यासाठी जास्त त्रास होऊ लागल्यानंतर कोरोनाची तपासणी करण्यात येते. त्यात संबंधित रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येतो. अशा गंभीर अवस्थेत संबंधित रुग्णाला घाटी रुग्णालयात पाठविण्यात येते. डॉक्टर रुग्णाला ऑक्सिजन, औषध, गोळ्या देऊन बरे करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर ही परिस्थिती बिघडत चालली तर व्हेंटिलेटर लावण्यात येतो. अनेक रुग्णांच्या फुप्फुसांमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग झालेला असतो.
यात ५० वर्षांवरील रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असून, बहुतांश मृत रुग्णांना कोरोनासह अन्य आजारही असल्याचे समोर आलेले आहे. यात मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब या आजारांचे प्रमाण अधिक आहे. एकाच वेळी अनेक आजारांमुळे उपचारास प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मृत्यूचा धोका वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शहरात मृत्यू पावलेल्या रुग्णांत ४० वर्षांखालील रुग्णांचे प्रमाण सर्वांत कमी आहे; तर ५० वर्षांवरील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मृत्यूचा सर्वाधिक धोका असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ज्येष्ठांची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून होत आहे.
एचआर सिटीचा उपयोग
कोरोनाच्या ज्या रुग्णांना श्वास घेण्यासाठी जास्त त्रास होतो, त्या रुग्णांचा पटकन सिटी स्कॅन करण्यात येत आहे. यामध्ये रुग्णाचे फुप्फुस किती निकामी झाले आहे, हे त्वरित लक्षात येते. त्यावरून डॉक्टर औषधोपचार करीत आहेत.
शहरी भागात दर महामृत्यूचे आकडे
महिना - मृत्यूची संख्या
मार्च (२०२०) - ००
एप्रिल - ०७
मे - ६७
जून - १९१
जुलै - १६९
ऑगस्ट - १२१
सप्टेंबर - १४२
ऑक्टोबर - ८२
नोव्हेंबर - ४०
डिसेंबर - ४४
जानेवारी (२०२१) - १९
फेब्रुवारी - १९
मार्च (१९ ता.) - ७५