औरंगाबाद : बायपासवर पुन्हा एका कंटेनरने मोपेडला धडक दिल्याने महिलेचा बळी गेला, तर १९ वर्षीय मुलगी दूर फेकल्याने जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ११.४० वाजता घडली. लताबाई श्रीरंग लोलेवार (४२, रा. नारायणनगर, आयप्पा मंदिराजवळ, बायपास), मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. अंजली लोलेवार असे जखमीचे नाव आहे.
आई लताबाईला घेऊन अंजली (एमएच-२०, डीके-१७३६) या मोपेडवरून दवाखान्यात जाण्यासाठी निघाल्या होत्या. बायपासवरील संग्रामनगर पुलाजवळील सिग्नलवर तिची मोपेड थांबली होती. त्यांना दर्ग्याकडे जायचे होते. पाठीमागून आलेल्या कंटेनर ट्रेलरच्या (एमएच-४६, एच-३८६८) चालकाने मोपेडला धडक दिली. महिला पुढील चाकाखाली आली, तर मुलगी व मोपेड बाजूला रोडवर पडली. अपघातात महिलेचा हात व पायाचे हाड मोडले होते. दोन्ही जखमींना नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी खाजगी दवाखान्यात दाखल केले; परंतु गंभीर जखमी लताबाईची प्राणज्योत मालवली. मृतदेह शासकीय दवाखान्यात हलविण्यात आला. त्या महिलेच्या शरीराला वरून किरकोळ खरचटलेले दिसत होते; परंतु आतून मात्र बरगड्या, लिव्हर व शरीरातील इतर अवयवांना मोठी इजा होऊन आत रक्तस्राव झाला होता. त्यातच तिचा मृत्यू झाल्याचे शवविच्छदेनात आढळल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोहेकॉ. शेषराव चव्हाण अधिक तपास करीतआहेत.
बायपास रोड मृत्यूचा सापळा
बायपास मृत्यूचा सापळा ठरला असून, आठ महिन्यांत देवळाई चौकात चार तर महानुभाव चौकापर्यंत बळीची संख्या ९ वर पोहोचली आहे. शाळकरी मुलांसह पालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनिता आल्हाट ही गरोदर महिला, मिस्त्री, साताऱ्यातील युवक मॉर्निंग वॉकला जाताना त्याला बजाज दवाखान्यासमोर अज्ञात वाहनाने उडविले. एमआयटीसमोर एक चिप्स विक्रेता, पैठण रोडवर डॉ. सारिका तांदळे, देवडानगर येथे एका मोपेडवरील महिलेला ट्रकने चिरडले आदी घटनांत ९ जणांचा बळी गेला आहे. एवढ्या अपघाताच्या घटना घडत आहेत; परंतु सर्व्हिस रोडचा मुद्दा मनपा व सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांवर ढकलून मोकळे होत आहेत.