- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : बाॅलिवूडचा बादशाह शाहरूख खानचा आगामी चित्रपट ‘जवान’चे चित्रीकरण (शूटिंग) बिडकीन येथील ‘डीएमआयसी’त झाले. त्यासाठी १५ दिवस ६०० जणांचे युनिट अहोरात्र कार्यरत होते. चित्रीकरण सलग १० दिवस चालले. त्यातील १० मिनिटांचे साहसी दृश्य (ॲक्शन सीन) चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. यासाठी औरंगाबादेत ३० कोटींची उलाढाल झाली आहे.
शाहरूख खान व गौरी खान यांच्या रेड चिलीज इंटरटेन्मेंटतर्फे ‘जवान’ हिंदी चित्रपट तयार केला जात आहे. याचे चित्रीकरण २७ नोव्हेंबर ते १३ डिसेंबरदरम्यान औरंगाबादेत झाले. ॲक्शन सीनसाठी बिडकीन डीएमआयसीतील ५.५ किमीचा ८ लेनचा मोकळा रस्ता निवडण्यात आला होता. ॲक्शन सीनमध्ये स्फोटाने यात ४० सेकंडहँड जीप उडविण्यात आल्या. २० ते २५ कंटेनर, २० दुचाकी भाड्याने घेतल्या. याशिवाय ॲपेरिक्षापासून ते क्रेन, जेसीबी, रोडरोलरपर्यंत सर्व तयार ठेवण्यात आले होते. ६०० लोकांना राहण्यासाठी शहरातील २ स्ट्रार, ३ स्टार, ५ स्टार हॉटेल १५ दिवस बुक होते. पंक्चरवाल्यापासून ते २५० ते ५०० केव्ही जनरेटरपर्यंत सर्व व्यवस्था करण्यात आली होती. सेक्युरिटी गार्ड, बाउन्सरही येथीलच होते. स्थानिक प्रशासनाच्या परवानगीपासून ते ५ स्टार हॉटेलपर्यंत सर्व खर्च मिळून १५ दिवसांत ३० कोटींपर्यंतची उलाढाल या शूटिंगमुळे झाली. एवढा मोठा खर्च केला जात होता, पण त्याचे ऑडिटही केले जात होते. चहाच्या एका कपाचेही ऑडिट केले जात होते. एवढे सूक्ष्म नियोजन करण्यात आले होते.
वर्षभरात १० पेक्षा अधिक चित्रपट, वेबसिरीजचे शूटिंग२०२३ या संपूर्ण वर्षात १० पेक्षा अधिक हिंदी चित्रपट व वेबसिरीजचे शूटिंग शहरात होत असून, त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. दरम्यान, 'जवान'च्या शुटींगमुळे औरंगाबादमधील ६० कलाकारांना काम मिळाले. तसेच स्थानिक १५० बिडकीनवासियांना यातून विविध प्रकारचा रोजगार उपलब्ध झाला. रेड चिली प्रॉडक्शन प्रमुख धरम सोनी, एक्झिक्युटिव प्रोडूसर प्रतिक रावल, किशोर निकम, प्रॉडक्शन मॅनेजर इम्रान शेख, अक्षय अहीरराव, रज्जाक शेख, भरत साळुंके, अनिकेत पाटेकर, साद शेख यांच्या देखरेखीत हे चित्रीकरण झाले.
हॉलिवूडच्या डायरेक्टरला भावले लोकेशनॲक्शन डायरेक्टर स्पिरो रझाटोस यांच्यासह अमेरिकेतून २५ ते ३० जणांचे पथक आले होते. सध्या बिडकीन डीएमआयसीत ८ लेनचा ५. ५ किमीचा मोकळा रस्ता चित्रपटातील विविध ॲक्शन सीनसाठी योग्य असून, येत्या काळात येथे आणखी चित्रपटांच्या शूटिंगसाठी आम्ही येऊ, असे सांगत त्यांनी जिल्ह्यातील अनेक स्थळांची माहिती जाणून घेतली, असे एट अवर्सचे संचालक किशोर निकम यांनी सांगितले.
साहसी दृश्यांसाठी ५० जीपचा अपघात‘जवान’साठी ५० जीप विकत घेऊन त्यांचा कंटेनरशी अपघात घडवून आणण्यात आला. यासाठी औरंगाबाद, जळगाव, पुणे, मुंबई येथून या सेकंडहँड जीप विकत आणण्यात आल्या होत्या. एकाही स्टंटमॅनला दुखापत झाली नाही.