छत्रपती संभाजीनगर : ब्युटी पार्लरच्या कामासाठी २२ वर्षीय वहिनीसोबत शहरात आलेल्या १४ वर्षीय मुलीकडून चौघांनी देहविक्री करवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हिरापूर शिवारातील एका रो-हाऊसमध्ये २२ एप्रिल ते २५ मेदरम्यान हा प्रकार घडत होता. चिकलठाणा पोलिस ठाण्यात याप्रकरणी मुन्ना सेठ, सीमा, रोजा व कुणाल नामक अनोळखी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्याचे कळताच आरोपी मात्र रो-हाऊस सोडून पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
२२ वर्षीय काजल (नाव बदलले आहे) पती, सासू, सासरे, दीर, नणंदेसोबत तामिळनाडूत चेन्नई येथे ८ महिन्यांपासून एका कंपनीत काम करीत होती. कोलकात्याला नोकरीदरम्यान तिची सीमा नामक महिलेसोबत ओळख झाली हाेती. सीमाने तिला छत्रपती संभाजीनगरमध्ये ब्युटी पार्लरचे काम असून, चांगला पगार मिळत असल्याचे आमिष दाखविले. काजलने तिला होकार कळवून मुलाचा सांभाळ करण्यासाठी १४ वर्षीय नणंद साक्षीला (नाव बदलले आहे) सोबत घेऊन आली. २४ एप्रिल रोजी त्या दोघी रेल्वेस्थानकावर पोहोचल्या. त्यानंतर सीमाने सांगितल्यानुसार रिक्षाने दोघी हिरापूरला गेल्या. मुन्ना नामक तरुणाने दोघींना दहा दिवस त्यांच्याच घरी थांबण्यास सांगितले.
रो-हाऊसमध्येच ग्राहक यायचेतिसऱ्या दिवशी अचानक रो-हाऊसमध्ये अनोळखी पुरुष आले. मुन्नाने अचानक साक्षीला त्यांच्यासोबत खोलीत जाण्यासाठी धमकावले. त्यानंतर जवळपास एक महिना तो सातत्याने साक्षीकडून वेश्या व्यवसाय करवून घेत राहिला. यादरम्यान त्याने बऱ्याचदा ग्राहकांसोबत साक्षीला विविध हॉटेलवरदेखील पाठविले.
रस्त्यावरच्या वादाने घटना उघडकीस९ मे रोजी मुन्नाच्या सांगण्यावरून काजल एका तरुणासोबत जालन्याला गेली होती. तेथून तिने पतीला कॉल करून हा सर्व प्रकार कळविला. १२ मे रोजी काजलचा पती शहरात आला. रो-हाऊसवर जाऊन त्याने मुन्नाला साक्षीला ताब्यात देण्यास सांगितले. मात्र, मुन्नाने त्याला जीवे मारण्याची धमकी देत हाकलले. काजल व तिचा पती थेट गावाला निघून गेले. २५ मे रोजी दोघे पुन्हा शहरात आले. दुपारी २ वाजता साक्षीला घेऊन रेल्वे स्थानकाकडे निघाले. मात्र, शहागंज परिसरात साक्षीने रिक्षातून पळ काढला. भररस्त्यावर त्यांच्यात झटापट झाली. पोलिसांनी तिघांना ठाण्यात नेले. तेव्हा साक्षीने पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. निरीक्षक निर्मला परदेशी यांनी गुन्हा दाखल करून चिकलठाणा पोलिसांकडे वर्ग केला. पोलिसांनी साक्षीला शासकीय बालगृहात रवाना केले.
हे प्रश्न अनुत्तरितचएक महिना साक्षीवर अत्याचार होत असताना काजल शांत का बसली? २५ मे रोजी रेल्वे स्थानकावर जात असताना मध्येच ते शहागंजात का गेले? १२ मे रोजी मुन्नाने साक्षीचा ताबा देण्यास नकार दिल्यावर पोलिसांना न कळविता ते गावाकडे का निघून गेले? त्यानंतर १३ दिवसांनी पुन्हा शहरात का आले? हे सर्व प्रश्न अनुत्तरित असून, पोलिस तपास करीत आहेत.