छत्रपती संभाजीनगर : आपल्या जीवनातील आनंदाचे क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपून त्या क्षणांना अविस्मरणीय करणारे शहरातील छायाचित्रकार १० दिवस आपला व्यवसाय बंद ठेवून दिंडीत जातात. तिथे वारकऱ्यांच्या सेवेत वाहून घेतात. काही जण दिंडीतील नावीण्यपूर्ण दृश्य टिपून घेतात. ही परंपरा आजची नव्हे तर तब्बल २० वर्षांची असून यंदाही छत्रपती संभाजीनगरातील ५० पेक्षा अधिक तरुण छायाचित्रकार दिंडीत सहभागी झाले आहेत.
प्रसाद महाराज अमळनेरकर यांची दिंडी रविवारी पैठणमधून पंढरपूरकडे रवाना झाली. त्या दिंडी सोबत शहरातील छायाचित्रकारही होते. संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन दिंडी निघाली. विठ्ठलाची ओढ सर्वांना लागली असल्याने सर्वजण वेगाने पंढरीकडे जात होते. प्रत्येकाची ओळख होती. वेगवेळ्या भक्तीचा मार्ग व भक्तीचा भाव बघायला मिळताे. छायाचित्रकारांसाठीही मोठी पर्वणी असते. सर्वच छायाचित्रकार छायाचित्र काढतात असे नाही अनेक जण विनाकॅमेरा येतात. याकाळात भाविकांच्या आरोग्याची काळजी घेणे, कोणी आजारी पडले तर डॉक्टर बोलवून त्यांची तपासणी करणे, त्याची देखभाल करणे, दिंडीच्या नियोजनात सहभागी होणे, असे विविध काम हे छायाचित्रकार करत असतात. पैठण, शेवगाव,पाथर्डी, कडा, आष्टी, करमाळा मार्गे १० व्या दिवशी पंढरपूरला पोहोचणार आहे.
एकजुटीचे दर्शन विठ्ठलाचे दर्शन व एकजुटीचे दर्शन मी मागील १७ वर्षांपासून दिंडीत सहभागी होत आहे. विठ्ठलाचे दर्शन घेणे हा उद्देश आहेच शिवाय छायाचित्रकार १० दिवस सोबत राहतात. दिंडीच्या नियोजनात सहभागी होतात. यातून आमची एकजूट निर्माण होते हे सर्वांत मोठे कारण होय. - राजेश घुले