छत्रपती संभाजीनगर : मराठा- कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबत शासनाने सेवानिवृत्त न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीसमोर बुधवारी १८ शिष्टमंडळ आणि सुमारे ७० नागरिकांनी मराठा- कुणबी नोंदी असल्याच्या पुराव्यांच्या प्रती सादर केल्या. या समितीसह आजवर दहा आयोग, समित्यांसमोर आरक्षणासाठी समाजबांधवांनी वेळोवेळी पुरावे, निवेदने सादर केले आहेत.
राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, राज्य मागासवर्ग आयोग, न्या. खत्री आयोग, न्या. बापट आयोग, न्या. सराफ आयोग, न्या. भाटिया आयोग, राणे समिती, न्या. म्हस्के आयाेग, न्या. गायकवाड आयोग आणि आता न्या. शिंदे समितीला कागदपत्रे व दस्तऐवज पुरावे म्हणून दिले.
मराठा- कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबत शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्या. शिंदे यांच्या नेतृत्वातील पाच सदस्यीय समितीने बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेतला. समितीने जिल्ह्यात आढळलेल्या ६६७ नोंदीतील बारकावे समजून घेतले. त्यानंतर नागरिकांकडे उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज स्वीकारले.समितीने बुधवारपासून मराठवाड्याचा दौरा सुरू केला असून पहिल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा आढावा घेतला. १२ ऑक्टोबरला जालना जिल्ह्यात बैठक होईल.
आयुक्तालयातील बैठकीला समितीचे सदस्य सचिव तथा विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, पोलिस आयुक्त मनोज लोहिया, जि.प. सीईओ डॉ. विकास मीना, पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया, विधि व न्याय विभागाचे सहसचिव सुभाष कराळे, उपसचिव विजय पवार, अव्वर सचिव पूजा मानकर, उपायुक्त जगदीश मिनियार, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, आरक्षण विशेष कक्ष प्रमुख शिवाजी शिंदे, विभागातील सर्व निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलविले होते.
जिल्ह्यातील ६६७ पुराव्यांचा अहवाल
जिल्ह्यात विविध १२ विभागांनी १९६७ पूर्वींच्या जवळपास २२ लाख अभिलेखांची तपासणी पूर्ण केली. त्यात ६६७ पेक्षा जास्त दस्तांवर कुणबी- मराठा अशी नोंद आढळून आली. त्यात महसूल, शैक्षणिक, भूमिअभिलेख आणि इतर अभिलेखांचा समावेश असून या माहितीचा अहवाल समितीला दिला. समितीने ती माहिती सोबत नेली. दरम्यान, सकल मराठा समाजाने दहा समित्या, आयोगांना आजवर निवदेन दिल्याचे सांगितले. निवेदन देण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळात प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, सतीश वेताळ, प्रा. दमगीर, मनोज गायके, सुकन्या भोसले, रेखा वहाटुळे, सुभाष सूर्यवंशी, तनश्री गायकवाड, प्रतिभा जगताप, रवींद्र वहाटुळे आदींचा समावेश होता.
मराठा पंच कमिटीने पुन्हा दिले पुरावे....बेगपुऱ्यातील मराठा पंच कमिटीने २०० वर्षे जुने तांब्याचे भांडे व त्यावर मराठा- कुणबी नोंद असलेले पुरावे समिती अध्यक्षांना दाखविले. कमिटीच्या शिष्टमंडळाने समितीला निवेदन दिले. १८८१ च्या जनगणनेत कुणबी म्हणून नोंद होती. निजाम संस्थानात नोंदी कमी होत गेल्या. निजामकालीन भांडी असून त्यावर कुणबी, असा उल्लेख आहे. बेगमपुऱ्यातील अनेक नागरिकांच्या शाळेच्या दाखल्यावर कुणबी नोंदी आहेत. कमिटीने २०१८ मध्ये समितीसमाेर पुरावे दिले होते. शिष्टमंडळात नानासाहेब पवार, किशोर शिंदे, प्रकाश पटारे, अजिंक्य काळे, अशोक विधाते, प्रतिभा जगताप, सुकन्या भोसले आदींचा समावेश होता.
‘त्या’ समितीला दिली होती ३० हजार निवेदनेराज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भात २०१८ मध्ये सुभेदारी विश्रामगृहात जनसुनावणी घेतली होती. आयोगाकडे ३० हजार निवेदने सादर करण्यात आली होती. आयोगाचे अध्यक्ष न्या. एम.जी. गायकवाड, तज्ज्ञ सदस्य डॉ. सर्जेराव निमसे, सुधीर ठाकरे, डॉ. राजेश करपे, रोहिदास जाधव आदींची त्यावेळी उपस्थिती होती.