छत्रपती संभाजीनगर : शहरात श्री गणरायाची अनेक मंदिरे आहेत. मात्र त्यात उजव्या सोंडेची मूर्ती असलेली बोटावर मोजण्याइतकीच मंदिरे आहेत. त्यातील एक विद्यापीठातील तळ्यातला गणपती मंदिर होय. या मंदिरात सुमारे ३५० वर्षे जुनी, तीही उजव्या सोंडेची पाषाणाची मूर्ती आहे. हे मंदिर मध्येच चर्चेत येण्याचे कारण म्हणजे या गणेशाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी पूर्वी तळ्यात उतरून जावे लागत असे. मात्र हा मार्ग सोपा झालाय तो भाविकांनी वर्गणी गोळा करून पूल तयार केल्यामुळे.
नावावरून तुम्हाला वाटेल की हे मंदिर तळ्यात खोल आहे का? पण तसे नाही. तळ्याच्या काठावर आहे. पण त्यासाठी तळ्यातून मार्ग काढत जावे लागत असे. २००६ मध्ये अतिवृष्टीने जुने मंदिर पडले. त्यावेळीस तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विकास निधीतून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मात्र, भाविकांना तळ्यात उतरून परत पलीकडील बाजूने पायऱ्या चढून मंदिरात जावे लागत होते. मात्र पावसाळ्यात येथील बंधाऱ्यामुळे ओढा भरून वाहतो. यामुळे भाविकांना गणपतीच्या दर्शनाला जाणे कठीण होत असे. अखेर माजी नगरसेवक गणू पांडे यांनी सर्व भाविकांना एकत्र करून येथे लोखंडी पूल बांधण्याचा निर्णय घेतला. त्यांना भाविकांनी साथ दिली. पावसाळ्याआधी पूल बांधून तयार झाला. या पुलाचे मंगळवारी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. पूल उभारणीसाठी किशोर तुळशीबागवाले, तुकाराम सराफ, नामदेव कचरे, नितीन पांडे, संदीप जगताप यांच्यासह शेकडो भाविकांनी परिश्रम घेतले.
५२ वर्षांपूर्वी सापडली मूर्तीविद्यापीठाच्या वनस्पती उद्यानाचे विस्तारीकरण चालू असताना १९६८-१९६९ दरम्यान जमिनीखाली एक दगडी मूर्ती सापडली. ती उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती होती. तसेच हनुमानाची, कालभैरवाची मूर्ती तसेच मंदिराचे अवशेष सापडले. हे मंदिर सुमारे ३५० वर्षे जुने असल्याचे त्यावेळी तज्ज्ञांनी सांगितले होते. मंदिराच्या बाजूला तळे असल्याने येथे बंधारा बांधण्यात आला.प्रा. अनिल मुंगीकर, मंदिरांचे अभ्यासक