छत्रपती संभाजीनगर : शहरातील सुमारे ११९ गुंठेवारी वसाहतींमधील मालमत्ता अधिकृत करून घेण्यासाठी महापालिकेने ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ दिल्याचे गुरुवारी प्रशासक जी. श्रीकांत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राज्य शासनाने शहरातील गुंठेवारी वसाहतींमध्ये असलेली २०२० पर्यंतची बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पालिका मागील काही वर्षांपासून प्रक्रिया राबिवत आहे. ३० सप्टेंबरपर्यंत प्रशासनाने नियमितीकरणास मुदत दिली होती, मात्र आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात विकास शुल्कामध्ये ५० टक्के सवलतही लागू राहील, असे प्रशासकांनी स्पष्ट केले.
पहिल्या टप्प्यात रेडिरेकनर दरानुसार गुंठेवारी नियमितीकरणाला ५० टक्के सवलत लागू होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही सवलत बंद केली. त्यामुळे गुंठेवारी मालमत्ता नियमितीकरणांच्या संचिका येण्याचे प्रमाण कमी झाले. सर्वस्तरांतून मागणी झाल्यानंतर प्रशासकांनी पुन्हा विकास शुल्कामध्ये ५० टक्के सवलत सुरू केली आहे. गुंठेवारीच्या संचिका दाखल करण्यासाठी यापूर्वी देण्यात आलेली मुदतवाढ ३० सप्टेंबर रोजी संपणार होती, आता ३१ डिसेंबरपर्यंत नागरिक गुंठेवारीच्या संचिका सादर करू शकतील. त्यासोबत ५० टक्क्यांची सूटही लागू राहणार आहे. असल्याचे प्रशासकांनी सांगितले.
‘ग्रीन’च्या ‘यलो’ झालेल्या संचिका स्वीकारणारशहराच्या अनेक भागात ग्रीन जमिनीवर नागरी वसाहती झाल्या आहेत. त्यामुळे विकास आराखड्यात या जमिनी यलो करण्यात आल्या आहेत. शासनाकडून विकास आराखड्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. तरीही त्या भागातील संचिका गुंठेवारी नियमितीसाठी स्वीकारल्या जातील.-जी. श्रीकांत, प्रशासक, मनपा
२२ कोटी ७५ लाखांचे उत्पन्नपाच महिन्यांत गुंठेवारी वसाहतींतून आलेल्या १५६० मालमत्तांच्या प्रस्तावातून १३१० प्रस्ताव मंजूर झाले. पालिकेला २२.७५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. प्रशासकांनी गुंठेवारीसाठी एक खिडकी योजना सुरू केली असून, आता संचिका मंजूर होण्यास गती मिळू शकेल.
शहरातील गुंठेवारी वसाहती : ११९मालमत्ता : १ लाखांहून अधिककोणत्या बांधकामे अधिकृत होणार : २०२० सालापर्यंतसंचिका दाखल करण्यास मुदत : ३१ डिसेंबर २०२४