छत्रपती संभाजीनगर : घर बांधल्यापासून वारंवार अर्ज करूनही वीजमीटर न मिळालेल्या तरुणाला महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याने मीटर देण्यासाठी साडेपाच हजारांची लाच मागितली. त्याने एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)कडे तक्रार केली. सोमवारी एसीबीने सापळा रचून कंत्राटी विद्युत तांत्रिक सहायक किशोर बन्सीलाल कानिसे याला पाच हजारांची लाच घेताना अटक केली.
तक्रारदार तरुणाने मिटमिटा परिसरात बांधलेल्या घराच्या विद्युत मीटरसाठी अर्ज केला होता. मात्र, सातत्याने वेगवेगळ्या कारणाने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अंधारात राहण्याची वेळ आल्यानंतर २५ जानेवारीला त्याने संतापून वरिष्ठांपर्यंत अर्ज केले. त्यानंतर कानिसेने त्याला 'वरपर्यंत पैसे द्यावे लागतात' असे सांगत ५,५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. वर्षभर चकरा मारायला लावूनही पैसे मागताच तरुणाला संताप अनावर झाला. त्याने थेट एसीबी अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली. आटोळे यांच्या सूचनेवरून उपअधीक्षक संगीता पाटील यांनी ️तक्रारीची खातरजमा केली. त्यात कानिसे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले.
उपअधीक्षक संगीता पाटील यांनी त्यानंतर सोमवारी सापळ्याचे नियोजन केले. कानिसेने तक्रारदाराला तडजोडीअंती पाच हजार रुपये मागून घरीच पैसे घेण्यासाठी येतो, असे सांगितले. पाटील यांच्यासह पोलिस नाईक राजेंद्र सिनकर, विलास चव्हाण, चांगदेव बागूल यांनी तक्रारदाराच्या घरात सापळा रचला. कानिसेने घरात जाऊन पैसे घेताच पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्यावर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.