छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ऐतिहासिक ग्रंथालयाच्या तळघरामध्ये दरवाजातून पाणी घुसले. त्याचवेळी ड्रेनेजलाइन तुंबल्यामुळे फुटली. त्या ड्रेनेजमधील घाण पाणीही आतमध्ये जाऊ लागले. तेव्हा ग्रंथालयात अभ्यास करत असलेल्या पीएच.डी.च्या १५ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांनी घाण पाण्यामध्ये उतरून बुकशेल्फच्या खालच्या दोन कप्प्यातील दोन हजारांपेक्षा अधिक ग्रंथ पाण्याबाहेर काढले. त्यामुळे मौल्यवान ग्रंथसंपदा थोडक्यात बचावल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
विद्यापीठाच्या ग्रंथालयात लाखो ऐतिहासिक ग्रंथ आहेत. ग्रंथांच्या सुरक्षिततेसाठी अनेकवेळा लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. काही वर्षांपूर्वी तळघरातील मौल्यवान ग्रंथ पाण्यात भिजल्यामुळे ग्रंथ ठेवण्यासाठी मजबूत लोखंडी बुकशेल्फ बनवून घेतले होते. विद्यापीठ परिसरात बुधवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. त्या पावसाचे पाणी ग्रंथालयाच्या तळघराच्या दरवाजातून आतमध्ये येऊ लागले. त्याचवेळी ड्रेनेज तुंबल्यामुळे फुटले. त्या ड्रेनेजचेही पाणी वेगात तळघरात येत होते. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास संशोधक विद्यार्थ्यांनी हे पाणी पाहिले. त्यानंतर ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांनाही सांगण्यात आले. प्रसंगावधान राखत विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांनी बुकशेल्फच्या पहिल्या कप्प्यातील ग्रंथ उचलण्यास सुरुवात केली. पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे काही वेळातच संपूर्ण तळघरात दोन फुटांपर्यंत पाणी भरले. त्यामुळे दोन कप्प्यातील २ हजारांपेक्षा अधिक ग्रंथ पाण्यातून बाहेर काढून वरच्या मजल्यासह वरिल कप्प्यामध्ये ठेवण्यात आले. ड्रेनेजमधून येणाऱ्या पाण्याची प्रचंड दुर्गंधी पसरली होती. त्या घाण पाण्यातूनही विद्यार्थ्यांनी ग्रंथ बाहेर काढण्यास प्राधान्य दिल्याची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
कुलगुरूंसह सदस्यांची ग्रंथालयाकडे धावग्रंथालयाच्या तळघरात पाणी शिरल्याची माहिती मिळताच कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी ग्रंथालयाकडे धाव घेतली. त्यांनी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांचे ग्रंथ वाचविल्याबद्दल आभार मानले. तसेच, पाणी बाहेर काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानंतर कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी महापालिकेच्या पथकासह अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर पंपाद्वारे पाणी काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अधिसभा सदस्य प्रा. हरिदास (बंडू) सोमवंशी, प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे यांच्यासह विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रंथालयाला भेट देत पाण्याबाहेर काढण्यासाठी प्रशासनाला मदत केली.