औरंगाबाद : पोलिसांच्या सतर्कतेमुळे क्रांती चौकात भाजप कार्यकर्ते आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमधील संघर्ष थोडक्यात टळला. रविवारी दुपारी भाजपचे आंदोलन उधळून लावण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमुळे मोठा वाद निर्माण होऊ शकतो, हे लक्षात येताच पोलिसांनी आंदोलनकर्त्या भाजप कार्यकर्त्यांना तेथून काढून दिले.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याच्या निषेधार्थ रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास भाजप कार्यकर्त्यांनी क्रांती चौकात आंदोलन केले. ते शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडेचा फोटो जाळणार असल्याचे तेथून जाणाऱ्या काही आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच हा प्रकार सुभेदारी विश्रामगृह येथे सुरू असलेल्या बैठकीतील कार्यकर्त्यांना कळवला. तेव्हा संतप्त कार्यकर्त्यांचा मोठा जमाव क्रांती चौकात चालून आला. महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीच्या समर्थनार्थ आंदोलन करणे, ही बाब चुकीची आहे. त्यामुळे आम्ही हे आंदोलन उधळून लावण्यासाठी आलो, अशी प्रतिक्रिया श्रावण गायकवाड, सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, मनोज वाहुळ, बाळू वाघमारे, पवन पवार, मनीष नरवडे, राजू आमराव, संदीप आहिरे, राहुल मकासरे या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे व्यक्त केली.
पोलिसांनी तुमचे आंदोलन संपले आहे, तुम्ही येथून निघून जा, असे म्हणत भाजप कार्यकर्त्यांना क्रांती चौक येथून काढून दिले. त्यानंतर आंबेडकरी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व घोषणाबाजी करत तेही निघून गेले.