लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : उद्धवसेनेचे लोक काँग्रेसच्या पालखीचे भोई आहेत. मोठ्या भावाची पालखी त्यांना वाहावी लागेल. तर महायुतीत आम्हीच मोठे आहोत, आमचा स्ट्राइक रेट मोठा आहे, असे शिंदेसेनेचे प्रवक्ते आ. संजय शिरसाट हे शनिवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
आ. शिरसाट यांच्या या विधानामुळे विधानसभा निवडणुकीतील जागांवरून अंतर्गत वादाचे 'बाण' सुटत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांच्या २८८ मतदारसंघांत तयारी करत असल्याच्या • विधानावर आ. शिरसाट म्हणाले, त्यांच्या वाढलेल्या ताकदीमुळे पक्ष वाढविण्याचा अधिकार त्यांना आहे. ज्यांनी त्यांची पालखी वाहली होती, त्यांनी पुन्हा त्यांची पालखी घेऊन जावे. नाशिक येथील महायुतीच्या बैठकीला छगन भुजबळ हे गैरहजर राहिले, याविषयी शिरसाट म्हणाले, महायुतीची नव्हे, तर त्या भागाची बैठक होती. कोअर कमिटीला उपस्थित राहणे, याला काउंट केले जाते. त्यामुळे भुजबळ काही कामानिमित्त गैरहजर राहिले असतील तर त्याचा इतका विचार करण्याची गरज नाही. भुजबळ यांची नाराजी हा रोजचा भाग आहे. राजकारणात प्रत्येक ज्येष्ठाचा सन्मान होतोच असे नाही, असेही आ. शिरसाट म्हणाले.
"उद्धवसेनेला चिंतन करण्याची गरज"
"आगामी विधानसभेच्या काळात महाविकास आघाडी टिकणार नाही. महाविकास आघाडीमध्ये ज्यांना खऱ्या अर्थाने फायदा झाला, त्यात काँग्रेस एक नंबरवर आहे. शरद पवार यांचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आणि जे जल्लोष करताहेत, ते तिसऱ्या क्रमाकांवर आहेत. काँग्रेस-शरद पवार गटामुळे उद्धवसेनेचे काय नुकसान होत आहे, याचे चिंतन केले पाहिजे. महाविकास आघाडीत कोण समाधानी आहे हा प्रश्न आहे," असेही आ. शिरसाट म्हणाले.