छत्रपती संभाजीनगर: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांच्यावतीने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी शुक्रवारी रात्री ८ वाजता एक शिष्टमंडळ चिकलठाणा विमानतळावरून विशेष विमानाने मुंबईला रवाना झाले.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे २९ ऑगस्टपासून आमरण उपोषण करीत आहेत. शासनाने विनंती करूनही मनोज जरांगे यांनी त्यांचे उपोषण मागे घेतले नाही. जरांगे हे त्यांच्या मागणीवर ठाम असल्याने त्यांचे उपोषण सुरूच आहे. यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांना चर्चेला मुंबईत येण्याचे आमंत्रण दिले. मात्र जरांगे यांनी त्यांचे एक शिष्टमंडळ पाठविण्याची तयारी दर्शविली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज रात्री ८ वाजता विशेष विमान छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा विमानतळावर पाठविले.
या विमानाने जरांगे यांचे शिष्टमंडळ मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. या शिष्टमंडळात डॉ.शिवानंद भानुसे, डॉ.सर्जेराव निमसे, बाळासाहेब सराटे, किशोर चव्हाण, प्रदीप पाटील, अंतरवाली येथील रहिवासी रमेश तारक, किरण तारक, श्रीराम कुरणकर, आदी आहेत. त्यांच्यासोबत या शिष्टमंडळात विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागस विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, शिवसेना नेते अर्जून खोतकर, तहसीलदार चंद्रकांत शेळके हे देखील मुंबईला रवाना झाले.